घरमहाराष्ट्रयंदाचा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' नवीन मैदानात

यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ नवीन मैदानात

Subscribe

पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा नव्या जागेवर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा महोत्सव संपन्न होतो. यासाठी दोन प्रतिष्ठित मंडळांनी मैदान देण्यास नकार दिला आहे.

पुण्याची सांस्कृतिक परंपरा समजल्या जाणाऱ्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’समोर नवीन समस्या उभी राहिली आहे. या महोत्सवासाठी हवे ते मैदान उपलब्ध होत नसल्याचे समजते आहे. त्यामुळे आता नवीन जागेत हा महोत्सव होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या शनिवार पेठेतील रमणबाग शाळेच्या मैदानावर हा महोत्सव होणार नसल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले आहे. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीनेही शाळेचे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे मंडळाला सांगितले आहे. तसे त्यांनी लेखी लिहून दिले आहे. त्यामुळे गेल्या तीन दशकांची परंपरा यंदा मोडणार, असेच चित्र दिसत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा संगीत महोत्सव होतो.

काय आहे सवाई गंधर्वची परंपरा

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातील गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ ची सुरुवात केली होती. भीमसेन जोशींच्या निधनानंतर या संगीत महोत्सवाचे नाव ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले. पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरु सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून म्हणजेच इ.स. १९५२ मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. त्यांचे गुरुबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरुभगिनी गंगुबाई हनगल यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता. हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडे तसेच पु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य लाभले.

- Advertisement -

या जागांवर पार पडला महोत्सव

सुरुवातीला आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला अशी त्रिस्थळी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर स्थिरावला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांना रुचले नसल्याने महोत्सव पुन्हा एकदा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. या महोत्सवात हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या गायकीने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -