घरमहाराष्ट्रआता टीव्हीवर भरणार चक्क शाळा!

आता टीव्हीवर भरणार चक्क शाळा!

Subscribe

टीव्हीवरची शाळा

असे कधी होईल
तर खूप मजा येईल

- Advertisement -

घरातल्या टी.व्ही.वर
शाळा जेव्हा भरेल
दप्तराच्या ओझ्याची
कटकट ना उरेल

डोके होईल माझे
नवे कॉम्प्युटर
गणिताचा धुव्वा उडेल
कसा भरभर

- Advertisement -

विषयांच्या सगळ्या
टी.व्ही.वर मालिका होतील
परीक्षेत अवघड पेपर
मग कसे जातील?

टी.व्ही.वरच्या शाळेत
नसेल अभ्यास, ना गृहपाठ
गाण्यासारख्या कविता
होतील सार्‍यांच्या तोंडपाठ

सिनेमासारखी भरेल शाळा
फक्त तीन तास
तरी होतील सारे
पहिल्या नंबराने पास

टी.व्ही.वरच्या शाळेत
मजा खूप येईल
पण खेळाच्या तासाचे
कसे काय होईल?
– राम अहिवळे

(1991 साली किशोर मासिकात
ही कविता प्रसिद्ध झाली होती.)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. मात्र सर्वच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने जिओ चॅनेल सुरू केले होते. परंतु ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून सुरू करण्यात येणार्‍या ‘टिलीमिली’ मालिकेचे वेळापत्रक 20 जुलैला शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार टी.व्ही.वरील ही शाळा 26 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भरणार आहे.

हसतखेळत, आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या सत्रातील सर्व पाठांवर आधारित ‘टिलीमिली’ ही मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील, मुलांना घरी करता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेता येईल, छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, ताण येणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या प्रयत्न करण्यात येणार आहे. या मालिकेत रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसात 60 एपिसोड्समध्ये दाखवले जाणार आहेत. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे सहा दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार असल्याने ‘टिलीमिली’ ही मालिका सलग 10 आठवडे प्रसारित केली जाईल. आठही इयत्तांचे मिळून 480 एपिसोड्स असलेली ही मालिका 26 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

या चॅनेलवर दिसेल मालिका
सह्याद्री दूरदर्शनवरील ‘टिलीमिली’ ही मालिका टाटा स्कायवर 1299, एअरटेलवर 548, डिश टीव्हीवर 1229, व्हिडिओकॉन डी2एच वर 769, डीडी फ्रीडिशवर 525 आणि हॅथवेवर 513 या चॅनल्सवरही बघता येणार आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -