घरमहाराष्ट्रमुंबई पोलीस आयुक्त पदासाठी सात महासंचालकांत रस्सीखेच

मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी सात महासंचालकांत रस्सीखेच

Subscribe

विद्यमान मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दोन वेळा मिळालेली मुदतवाढ येत्या 29 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने त्यांच्या जागी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याबाबत आयपीएस अधिकार्‍यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपद यावेळी कोणत्याही लॉबिंगशिवाय ज्येष्ठतेनुसार द्यावे यावर तीनही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत झाले असून, तसे झाल्यास प्रतिष्ठेच्या मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी मागील दोन महिने भेटीगाठी आणि लॉबिंग करणार्‍या अधिकार्‍यांना दणका मिळण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील सुमारे अर्धा डझन निर्णय आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलले आहेत. त्यातच फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या काळात क्रिम पोस्ट मिळालेल्या पोलीस अधिकार्‍यांना ‘जोर का झटका धीरे से’, देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री ठाकरे असल्याची माहिती गृहविभागातील एका ज्येष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत सर्वात वर नाव असलेले अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे महासंचालक परमबीर सिंग यांचे नाव पिछाडीवर पडले असून, पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्येंकटेशम यांनाही पुण्यातच ठेवण्याबाबत एकमताचा सूर विधानभवनात बुधवारी ऐकायला मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुंबईचा पोलीस आयुक्त कोण हे शेवटच्या क्षणी सर्वांना कळेल अशी माहितीही गृहविभागातील एका बड्या अधिकार्‍याने दिली.

- Advertisement -

सध्या देशात आणि राज्यात सीएए, एनआरसीवरून आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. दिल्लीत मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीचे लोण आपल्याकडे येऊ नये म्हणून महाराष्ट्रात विशेष काळजी घेतली जात आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांना मिळालेली मुदतवाढ 29 फेबुवारी रोजी संपत आहे. केंद्र सरकारने 1985 च्या बॅचचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांची मंगळवारपासून दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नेमणूक केली आहे. श्रीवास्तव हे सीआरपीएफमध्ये होते. अमूल्य पटनाईक हेही 1985 च्या बॅचचे आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल हे दिल्लीचे पोलीस आयुक्त होतील अशी चर्चा होती. जैस्वाल हेही 1985 च्या बॅचचे आहेत. त्यामुळे दिल्लीसारख्या संवेदनशील राज्यातही केंद्र सरकारने सेवा ज्येष्ठतेनुसार पदभार दिला आहे.

दिल्लीतील हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री हिंसाचार झालेल्या भागाची पाहणी केली. डोवाल हे हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असून, लवकरच ते आपला अहवाल केंद्रीय कॅबिनेटपुढे सादर करतील असे सांगण्यात येत आहे. दिल्ली शांत करण्याची जबाबदारी जर डोवाल यांच्याकडे मोदी सरकारने दिली तर डोवाल यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळख जाणारे सुबोध जैस्वाल हे दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून जातील अशी चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे. नाहीतर श्रीवास्तव यांच्याकडेच दिल्लीचा पोलीस आयुक्त पदाचा पदभार दिला जाईल कारण श्रीवास्तव आणि जैस्वाल हे दोघेही 1985 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

- Advertisement -

दिल्लीचे सत्र मुंबईत पसरू नये म्हणून तेवढाच डॅशिंग अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर असावा यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. तसेच नुकताच माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया आणि एटीस प्रमुख देवेन भारती यांनी शीना बोरा हत्येच्या तपासाबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. ते पाहता आयपीएस कॅडरमध्ये ज्युनियर अधिकार्‍याला पोलीस आयुक्तपदावर बसवल्यास पुन्हा नव्याने गटातटाचे राजकारण मुंबई पोलीस दलात होण्याची भीती आहे. त्यामुळे आयपीएस अधिकार्‍यांना एक चांगला संदेश देण्यासाठी धडाकेबाज अधिकार्‍याची नियुक्ती करावी, मात्र तोे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय नसेल याकडेही शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले. ज्या अधिकार्‍यांची नावे आघाडीवर आहेत त्यात परमबीर सिंग, के व्येंकटेशम, बिपिन बिहारी, हेमंत नगराळे, रशमी शुक्ला आणि रजनीश शेठ यांची नावे आहेत.

संजय पांडे सर्वात ज्येष्ठ महासंचालक
विद्यमान पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ अधिकारी होमगार्डचे महासंचालक संजय पांडे आहेत. पांडे 1986 च्या बॅचचे असून, मागील साडेचार वर्षे ते होमगार्डमध्ये आहेत. तर 1987 च्या बॅचचे एस एन पांडे, डी. कनकरत्नम आणि बिपिन बिहारी हेही आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत. तर 1988 च्या बॅचचे परमबीर सिंग आणि के. वेंकटेशम आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त हे महासंचालक दर्जाचे आहे. 1986, 1987 आणि 1988 चे मिळून सात अधिकारी महासंचालक दर्जाचे आहेत. सातपैकी एका महासंचालकाला मुंबई पोलीस आयुक्तपदाचा मान मिळणार असून, त्याची निवड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख येत्या दोन दिवसांत करतील अशी माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -