घरताज्या घडामोडीनवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचे राणेंच्या अटकेवर बोट, म्हणाले पंतप्रधान खुलासा करणार...

नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचे राणेंच्या अटकेवर बोट, म्हणाले पंतप्रधान खुलासा करणार का ?

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरसोबत जमीनीचे व्यवहार करत मनी लॉड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना झालेल्या अटकेचे पडसाद हे राज्याच्या विधीमंडळात दिसले आहेत. नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी विधीमंडळाचे कामकाज सुरळीतपणे चालू दिलेले नाही. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यापासून ते मोर्चाचीही घोषणा करण्यात आली आहे. पण नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज व्यक्त झाले आहेत. त्यांनी संपूर्ण राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य केले आहे. तसेच राजीनाम्याच्या प्रकरणात नारायण राणेंच्या निमित्ताने त्यांनी काही प्रश्नदेखील उपस्थित केले आहे. या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौऱ्यात खुलासा करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली हे उघड आहे. नवाब मलिक हे गेली २० वर्षे विधानसभेत आहेत. पण इतक्या वर्षाच्या काळात नवाब मलिकांच्या बाबतीत कधीच असे चित्र दिसले नाही. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याचे नाव दाऊदशी हमखास जोडले जाते. नवाब मलिकांचा राजीनामा मागितला जातो आहे, मला त्याची चिंता नाही. हे विरोधी पक्षातील लोक या पद्धतीने वातावरण निर्मिती करतात. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. जी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली गेली, त्यामधून कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला असल्याचे बोलले जात आहे. पण याविरोधात आम्ही संघर्ष करू असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी अटक केली त्यामुळेच राजीनाम्याची मागणी होत आहे. आमचे सिंधुदुर्गचे जुने सहकारी राणे यांनाही अटक केली होती, असे वाचनात आले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात अटक केल्यानंतर मंत्रीमंडळातून काढून टाकण्याचा भाजपने निर्णय का घेतला नाही ? असाही सवाल शरद पवार यांनी केला. उद्या पंतप्रधान पुण्यात येत आहेत, ते खुलासा करतील. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय लावण्याचा प्रकार आहे. नारायण राणेंना एक न्याय लावता, दुसरा नवाब मलिकांना दुसरा न्याय लावता, असाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -