घरमहाराष्ट्रपुणेLoksabha 2024: शरद पवारांचा 'या' मतदारसंघासाठी नवा डाव; जानकरांना पाठिंबा देण्याची तयारी?

Loksabha 2024: शरद पवारांचा ‘या’ मतदारसंघासाठी नवा डाव; जानकरांना पाठिंबा देण्याची तयारी?

Subscribe

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी डावपेच खेळायला सुरुवात केली आहे. कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना मैदानात उतरवण्याची त्याची तयारी सुरु आहे. तर माढा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यामध्ये आज फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्यातील लोकसभेच्या ज्या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची ताकद कमी आहे, त्या मतदारसंघात नवे उमेदवार देऊन तिथे ताकद आजमावण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून सुरु झाले आहेत. त्यामुळेच माढा मतदारसंघातून जानकरांना पाठिंबा देऊन त्यांना महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले आहेत. महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत आल्यास या मतदारसंघातील गणित बदलू शकते अशी परिस्थिती आहे. जानकरांनीही याआधीच स्पष्ट केले आहे की ते परभणी किंवा माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळेच माढ्यासाठी शरद पवारांनी जानकरांचा विचार केला आहे.

- Advertisement -

माढ्यातून जनकरांना उमेदवारीचा फायदा बारामतीत सुप्रिया सुळेंना?

माढा मतदारसंघांची निर्मिती 2009 साली झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. सुप्रिया सुळे या बारामतीमधून उभ्या राहिल्यानंतर माढा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार येथून विजयी झाले होते. दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि तेही विजयी झाले होते. तिसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर येथून खासदार झाले. 2019 मध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या त्यामुळे भाजपला येथे विजय मिळाला होता. आता माढा लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. अशावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य कठीण मानले जात आहे. मात्र महादेव जानकर यांना येथून उमेदवारी दिली तर चित्र बदलू शकते, अशी शक्यता शरद पवारांना वाटत आहे. 2009 मध्ये जानकरांना येथे एक लाखांपर्यंत मते मिळाली होती. सध्या या मतदारसंघात रासपची ताकद वाढली आहे. जानकर यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला तर त्याचा त्रास भाजपला इतर मतदारसंघातही होऊ शकतो, असाही कयास आहे.

माढ्यातून जानकरांच्या उमेदवारीचा फायदा बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मिळण्याचीही शक्यता आहे. बारामतीमध्ये मोठ्या संख्येने धनगर समाजाचे मतदान आहे. शरद पवारांचा माढ्यात जानकरांना पाठिंबा मिळाला तर बारामतीमध्ये जानकरांचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Sharad Pawar : वळसे पाटलांच्या मतदारसंघात त्यांनाच पाडण्याचे शरद पवारांकडून आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -