घरमहाराष्ट्रपुणेSharad Pawar : वळसे पाटलांच्या मतदारसंघात त्यांनाच पाडण्याचे शरद पवारांकडून आवाहन

Sharad Pawar : वळसे पाटलांच्या मतदारसंघात त्यांनाच पाडण्याचे शरद पवारांकडून आवाहन

Subscribe

पुणे : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे शरद पवार गट आणखीनच आक्रमक झाला आहे. अशातच आता अजित पवारांबरोबर गेलेल्या दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला असणाऱ्या आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सभा आज पार पडली. यावेळी शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात पाडण्याचे आवाहन केले आहे. (Appeal from Sharad Pawar to overthrow Dilip Valse Patil in his constituency)

हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

- Advertisement -

दिलीप वळसे पाटील यांचं नाव न घेता शरद पवार म्हणाले की, तुमच्या तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत काम केलं. अनेकांनी प्रामाणिकपणे काम केलं, ते हयात नाहीत. निष्ठा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना काय द्यायचं राहिलं होतं? काय कमी पडू दिलं? आमदार केलं, अनेक मंत्रीपदे दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर उद्योगाचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली. एवढं सर्व देऊनही त्यांच्यात पाच टक्केही निष्ठा राहिली नाही. ते निघून गेले. असे लोक नागरिकांशीही निष्ठा पाळणार नाहीत. त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला.

भीतीच्या संकटामुळे लोक दुसऱ्या बाजूला गेले

नागरिकांना उद्धेशून बोलताना शरद पवार म्हणाले की, मागच्या निवडणुका आठवा. मागच्या निवडणुकीत आपल्या जिल्ह्यातील उमेदवार कुणाच्या नावावर निवडणूक लढवत होते? निवडणुकीत त्यांनी कुणाचा फोटो वापरला होतो? हे सर्व माहीत असताना कुठून तरी तुरुंगात टाकण्याची धमकी आली, भीतीचं संकट आलं म्हणून हे लोक दुसऱ्या बाजूला गेले. त्यामुळे आता आपल्याला जागं व्हावं लागेल. अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातील लोकांनी माझ्यासोबत काम केलं. आज हे लोक हयात नाहीत. या लोकांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्याकडे निष्ठा होती. त्यांनी निष्ठेशी कधी तडजोड केली नाही. राज्यात आम्ही ज्या पक्षाची स्थापना केली, तो पक्ष फोडला गेला. पक्षातील अनेक लोक निघून गेले. त्यांना निवडून कुणी दिलं? असा प्रश्न शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Jarange VS Baraskar : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’

काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिल्याचं अशोक चव्हाण विसरले

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्याबद्दल मोदींनी कुठे तरी जाहीर भाष्य केलं होतं. परिणाम काय झाला? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण भाजपात गेले. काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिल्याचंही ते विसरले. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, नेते फोडणं सध्या राज्यात सुरू आहे. जायचं तर तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात या, अशी धमकी दिली जात आहे. आज काय चित्रं आहे? असा सवाल करत भ्रष्टाचाराचा नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा, अशी स्थिती आज देशात आहे. त्यामुळेच तुरुंगात जाण्याऐवजी भाजपामध्ये जाण्याची ही भूमिका अनेक राज्यातील नेते स्वीकारताना दिसत आहेत. अशी स्थिती राज्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपल्याला संघर्ष करावा लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -