घरमहाराष्ट्रकोल्हापुरात ठाकरे-फडणवीस भेटले अन् सांगलीत दोघांचे कार्यकर्ते भिडले

कोल्हापुरात ठाकरे-फडणवीस भेटले अन् सांगलीत दोघांचे कार्यकर्ते भिडले

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत मुख्यमंत्री व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असतानाच गोंधळ झाला. भाजप कार्यकर्त्यांनी अचानक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. त्याचवेळी त्याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोनेही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

सांगली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी एकच्या सुमारास सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं. यानंतर तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी आक्रमक होत भाजप विरोधात घोषणाबाजी सुरू केल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आवाज कुणाचा, शिवसेने’चा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा या परिसरातून निघून गेला. तर पोलिसांनी तात्काळ धाव घेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री गेल्यानंतरही तब्बल १५ मिनिटं हा गोंधळ सुरूच होता. दरम्यान, पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी आमची निवेदनं घेतलेली नाहीत. हा पूरग्रस्तांचा अपमान आहे. याआधिचे मुख्यमंत्री घरोघरी जावून पूरग्रस्तांचे अश्रू पुसायचे. मात्र, हे मुख्यमंत्री आमचा अपमान करून गेले, असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. तर भाजपचा हा दावा मात्र शिवसैनिकांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्री सकाळपासून फिरत असून लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत, असं म्हटलं. सांगलीतील इतर गावातील लोकांनी शांतपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली. मात्र, भाजपने निवेदन न देता स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शिवसेनेने केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -