घरमहाराष्ट्रशिवसेनेचा मोदींवर व्यंगचित्रबॉम्ब

शिवसेनेचा मोदींवर व्यंगचित्रबॉम्ब

Subscribe
मुंबईसह देशभरात सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये सध्या व्यंगचित्रवॉर सुरू झालेले ट्विटरवर दिसत आहे. राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राला उत्तर देताना राज्यातील भाजपने शरद पवार-राज ठाकरे यांच्या मुलाखतीवर हल्ला चढवित प्रत्युत्तर दिले असून त्यानंतर मनसे-भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. तर व्यंगचित्रांच्या या स्पर्धेत आता शिवसेनेनेही उडी घेतली असून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवरुन राम मंदिराच्या मुद्यावरुन शुक्रवारी व्यंगचित्र प्रसिद्ध करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेने काढलेल्या या व्यंगचित्रात मोदी आणि शहा  यांना एका बॉम्बवर बसविण्यात आले असून त्याचा स्फोट होण्याआधीच निर्णय घेण्याचा खोचक सल्ला यावेळी शिवसेनेने दिला आहे.
   मुंबईसह देशभरातील राजकीय वातावरण लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीवरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण करीत मोदींवर टीकेचा भडीमार केला. या मुलाखतीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका करत ही मुलाखत मॅनेज असल्याचा आरोप केला. ‘एक मनमोकळी मुलाखत’ असे या मुलाखतीचे वर्णन करुन राज यांनी मुलाखतीची खिल्ली उडवली होती. राज ठाकरें यांचे हे व्यंगचित्र भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांना चांगलेच झोंबले. या व्यंगचित्राच्या विरोधात त्यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर राज्यातील भाजपच्या  अधिकृत ट्विटरवरुन राज ठाकरेंच्या विरोधात व्यंगचित्र प्रकाशित करुन मनसेला फैलावर घेण्यात आले. या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीला लक्ष्य करण्यात आले आहे. क्रोध मोदींच्या यशाचा, अशा आशयाच्या या व्यंगचित्रात एक सेटिंगवाली मुलाखत अशी टीका भाजपने केली. एकीकडे भाजप आणि मनसेत या व्यंगचित्रावरुन शीतयुध्द सुरु झाल्यानंतर आता शिवसेना मागे राहिलेली नाही. शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्यावरुन शुक्रवारी अधिकृत वेबसाईटवर व्यंगचित्र प्रकाशित करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या या व्यंगचित्रात मोदी आणि शहा यांनी राम मंदिराच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. या मुद्यावर आधारीत व्यंगचित्र शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या व्यंगचित्रामध्ये ‘राम मंदिर’ असे शब्द लिहिलेल्या एका मोठ्या बॉम्बवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बसलेले दाखवण्यात आले आहेत. या बॉम्बची वात  एक व्यक्ती पेटवत असल्याचं दिसत असून ही व्यक्ती म्हणजे राम मंदिराची वाट पाहणारा हिंदू समाज असल्याचं दाखवण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या व्यंगचित्राला आता  राज्य भाजप काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -