घरमहाराष्ट्रठाकरे विरुद्ध फडणवीस सामना रंगात

ठाकरे विरुद्ध फडणवीस सामना रंगात

Subscribe

बाळासाहेबांनीच शिवसेनेला युतीत सडवले का?, देवेंद्र फडणवीस यांचा खडा सवाल, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला फडणवीस यांचे उत्तर

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना राज्यात हिंदुत्व तसेच युतीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय आरोप- प्रत्यारोपांचा सामना रंगताना दिसत आहे. भाजपसोबत २५ वर्षे शिवसेना सडली म्हणता; पण २०१२ पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच युतीचे नेते होते. मग त्यांनीच शिवसेनेला सडत ठेवले का? त्यांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवता का? असा बोचरा सवाल करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या हल्ल्याला तिखट प्रत्युत्तर दिले.

तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते असे म्हणता, तर मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? तुम्हाला मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला. यात सगळे काही आले, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत असताना शिवसेना- भाजपमधील वाक्युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल रविवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर जबरदस्त अशी टीका केली होती. या टीकेला फडणवीस यांनी सोमवारी सडेतोड उत्तर दिले, शिवसेना जन्माला येण्याआधी मुंबईत आमचे नगरसेवक, आमदार होते असे सांगताना फडणवीस यांनी शिवसेनेने १९८४ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढली होती आणि मनोहर जोशी तुमचे उमेदवार होते, याची आठवण ठाकरे यांना करून दिली. राममंदिराच्या आंदोलनात भाजप आणि संघाचे स्वयंसेवक होते. राममंदिरच्या आंदोलनात तुम्ही कुठे होता. आम्ही लाठ्या, काठ्या खाल्ल्या. तुम्ही फक्त तोंडाची वाफ दवडत होतात. तुमचे हिंदुत्व हे कागदावरचे हिंदुत्व आहे. तुम्ही औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करू शकला नाहीत; पण तिथे अलाहाबादचे प्रयागराज झाले, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

शिवसेनाप्रमुखांची रविवारी जयंती होती.भाजपच्या सर्वच नेत्यांनी शिवसेनाप्रमुखांना ट्विटरद्वारे किंवा प्रत्यक्ष आदरांजली वाहिली.काँग्रेसच्या एका तरी नेत्याने तसे केले का? तरीही तुम्ही सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता ना, असा घणाघातही फडणवीस यांनी केला. २०१२ पर्यंत तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच युतीचे नेते होते.युतीचा निर्णयही त्यांनी केला होता.त्यांच्या हयातीत त्यांनी युती कायम ठेवली. मग बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवता का? बाळासाहेबांनीच शिवसेनेला सडत ठेवले असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असा सवाल करताना उद्धव ठाकरे यांना सिलेक्टिव्ह विसरायची सवय आहे, असा टोला लगावला. मोदींनी करून दाखविले आहे. त्यांच्या नेतृत्वात अयोध्येत राममंदिर तयार होत आहे. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवू शकला नाहीत. हिंदुत्व हे बोलून दाखवायचे नसते तर करून दाखवायचे असते. काशी विश्वनाथचेही काम मोदींनी केले, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

भाजपसोबत असताना ते पहिल्या क्रमांकावर होते.भाजपला सोडल्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. नगरपंचायत निवडणुकीत ते आता चौथ्या क्रमांकावर आहेत.त्याचे शल्य ते बोलून दाखवत आहेत.कोणाकडे ते सडले ते त्यांनी पहावे, असा आत्मपरीक्षणाचा सल्ला देताना फडणवीस यांनी, राममंदिर आंदोलनानंतर शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण होते असा त्यांचा दावा आहे.१९९३ च्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर प्रदेशात १८० उमेदवार उतरविले. त्यातील फक्त एकाचे डिपॉझिट वाचू शकले.१९९६ मध्ये तुम्ही २४ उमेदवार लढवले, त्यातील एकाचेच डिपॉझिट वाचले.२००२ साली ३९ उमेदवार लढविले त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले, याची आठवण करून दिली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते असे म्हणता, तर मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? तुम्हाला मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला. यात सगळे काही आले. भाजपचा जन्म व्हायच्या आधी शिवसेनेचे वाघ अनेकदा मुंबईतून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल. या सगळ्या गोष्टी फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या आहेत.
-संजय राऊत, शिवसेना खासदार

मागील 8 वर्षांपासून केंद्राच्या आदेशावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिवसेनेला संपविण्याचे राजकारण करत होते. मात्र ,आता शिवसेनेची किंमत कळू लागल्यामुळे फडणवीस यांच्याकडून अशी विधाने होत आहेत.
-नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -