घरमहाराष्ट्रनाशिकश्रावणी सोमवार : नंदीविना महादेवाचे जगातील एकमेव मंदिर "कपालेश्वर"

श्रावणी सोमवार : नंदीविना महादेवाचे जगातील एकमेव मंदिर “कपालेश्वर”

Subscribe

स्वप्निल येवले । पंचवटी

जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवाच्या समोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला, तरी नाशिकच्या एका मंदिरात मात्र महादेवांच्या पिंडीसमोर नंदी नाही हे कसे घडले, महादेवांनी याठिकाणी नंदीला आपला गुरु का मानलं? तर चला, जाणून घेऊ या नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिरा विषयीची महती.

- Advertisement -

नाशिक शहरात गोदावरी जिथे दक्षिण वाहिनी झाली आहे, त्या रामकुंडा समोरच्या टेकडीवरचे श्री कपालेश्वर महादेव मंदिर आहे. जिथे श्री विष्णूंनी स्वतः महादेवाच्या पिंडीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे कपालेश्वराच्या दर्शनातून बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनापेक्षा जास्त पुण्य लाभते असे मानले जाते. कपालेश्वर अर्थात साक्षात भगवान शंकरांनी इथे निवास केल्याचा उल्लेख मार्केंडेय पुराणाच्या आख्यायिका मध्ये आढळतो. श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो. या मंदिरात नेहमी पेक्षा जास्त श्रावण महिन्यात भाविकांची मोठी रिघ लागलेली बघायला मिळते.

अशी आहे आख्यायिका

कपालेश्वर मंदिर येथे नंदी का नाही याचीही मार्कण्डेय पुराणात एक कथा आहे. एकदा इंद्रसभा भरलेली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्याच वेळी पाच तोंडे असणार्‍या ब्रम्हदेवांची चार तोंडे हे वेद म्हणत होते तर पाचवे तोंड देवांची निंदा करीत होते. सर्व देवांची निंदा करत असतांना शेवटी ब्रम्हदेवाच्या पाचव्या तोंडाने महादेवांची निंदा करण्यास सुरुवात केली. ते ऐकून महादेवांना क्रोध अनावर झाला आणि त्यांनी ब्रम्हदेवाचे ब्रम्हास्त्र घेऊन त्यांचा शिरच्छेद केला. ते शिर त्यानंतर महादेवांच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे महादेवाला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पातकापासून मुक्तता मिळवण्यासाठी भगवान शंकर आणि नंदी ब्रह्मांडभर फिरत होते. ते फिरत फिरत नाशिकस्थित एका देवॠषी ब्राह्मणाकडे आश्रयास थांबले होते. त्या देवॠषी ब्राह्मणाकडे एक गाय व तिचा गोर्‍हा होता. त्या गाय आणि गोर्‍हाच्या संवादात गोर्‍हा म्हणाला की, ‘मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार’. त्यावर गायीने गोर्‍ह्यास म्हटले की, ‘तू जर हे केलेस तर तुला एका ब्राह्मणाला मारल्याचे म्हणजे ब्रह्महत्येचे पातक लागेल’. त्यावर तो गोर्‍हा म्हणाला, ‘मला त्यावरचा उपाय माहीत आहे.’ भगवान शंकर यांनी सांगितल्याप्रमाणे गोदावरी नदीस्थित रामकुंड येथील त्रिवेणी संगमात स्नान केल्यास ब्रम्हहत्येचे पातक नष्ट होते. हे सर्व संभाषण भगवान शंकर आणि नंदी ऐकत होते. त्यावर नंदीने ही गोष्ट महादेवाच्या लक्षात आणून देतो, की आपण ही जर त्या रामकुंड येथील त्रिवेणी संगमावर स्नान केले तर आपल्या हातून घडलेले पातक नष्ट होईल. त्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी गोदावरीच्या पात्रातील (रामकुंडात) त्रिवेणी संगमावर येऊन महादेव आणि नंदी यांनी स्नान केले असता त्यांचे पातक नष्ट झाले.

- Advertisement -

त्याच गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात भगवान शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर भगवान शंकरांनी सांगितले की ’तुझ्या उपदेशामुळे माझ्या हातून घडलेल्या ब्रह्महत्येच्या पातकातून माझी मुक्तता झाली आहे, यापुढे तू माझ्यासमोर थांबू नकोस तू जर समोर बसलास तर लोक तुला माझा शिष्य समजतील तू माझ्या गुरु समान आहेस’ असे नंदीस सांगितले. त्यावर भगवान शंकरांनी नंदीला विश्रांती घेण्यासाठी सांगितले असता नंदी तेथून निघून जाऊन नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे विश्रांतीसाठी गेला. सर्व भगवान शंकरांच्या समोरील नंदी काळ्या पाषाणातील असून एकमेव त्र्यंबकेश्वर येथील नंदी पांढरा आहे. रामकुंड येथील त्रिवेणी संगमातील स्नानामुळे त्याचा रंग पांढरा झाल्याचे मार्कण्डेय ॠषींच्या पुराणात लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -