भुसे, कांदेंच्या प्रभावक्षेत्रात सेनेची खांदेपालट

नाशिक : बंडखोरांच्या गटात सामील झाल्याने माजी मंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघाची जबाबदारी मनमाडचे गणेश धात्रक यांच्याकडे पक्षाने सोपवली आहे. नांदगाव, मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. निफाड, येवला व चांदवड विधानसभेची जबाबदारी येवल्याचे कुणाल दराडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी जुने शिवसैनिक जयंत दिंडे यांची नियुक्ती केली आहे. दिंडोरीचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्याकडे दिंडोरी, कळवण व बागलाण या मतदार संघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत निष्ठेची लढाई सुरु झाली आहे. धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाकडे जाणार नाही, याची पुरेपुर काळजी पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात आहे. अशा परिस्थितीत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षातील महत्वाची पदे बहाल करुन त्यांना बळ देण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे. तसेच सोडून गेलेल्या आमदारांना शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने बुधवारी (दि.13) नवीन जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिंडोरी लोकसभा व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी दोन संपर्क प्रमुख यापुढे असतील. यात दिंडोरीची जबाबदारी जयंत दिंडे यांच्याकडे तर सहसंपर्कप्रमुख म्हणून मनमाडचे अल्ताफ खान यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. नाशिक लोकसभेची जबाबदारी भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे राहील. विशेषत: मालेगाव बाह्य, मध्य व नांदगाव मतदारसंघाची नव्याने मोट बांधण्यासाठी मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहेत. आमदार सुहास कांदे यांच्याकडील जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी पक्षाने काढून घेतली आहे. तर निफाड, येवला व चांदवडमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी येवल्याचे युवा नेते कुणाल दराडे यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हाप्रमुख पदाचा दोन महिन्यापुर्वीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे पदभार काढण्याचा विषयच उद्भवत नाही. मूळात शिवसेना आमची असून यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. अशा परिस्थीतीत आम्हाला पदावरून हटवण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. मनापासून सांगतो उद्धव साहेबांनी हे निर्णय घेतलेले नसावे. : सुहास कांदे, आमदार