घरमहाराष्ट्रएसटी कर्मचारी बदल्यांचा प्रवाशांना बसतोय फटका

एसटी कर्मचारी बदल्यांचा प्रवाशांना बसतोय फटका

Subscribe

एसटीच्या वाहक आणि चालकांच्या बदल्यांचा फटका येथील प्रवाशांना बसत आहे. यात विद्यार्थ्यांची अधिक फरफट होत आहे.हक्काच्या असलेल्या एसटीच्या मोजक्या फेर्‍या सध्या येथे बस स्थानकात होत आहेत. कर्जत डेपोतील जवळपास 80 वाहक-चालकांची एकाच वेळी बदली झाल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून बस जागची हललेली नाही. महत्त्वाचे म्हणजे सकाळी शाळा, कॉलेजच्या वेळेत असणार्‍या एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय कामगार, नोकरदार यांनादेखील नियमित येणारी एसटी रद्द झाल्यामुळे धावपळ करावी लागत आहे. कर्जत डेपोची आपटा-खोपोली, कर्जत-पाली बसची वेळ विद्यार्थ्यांना सोयीस्कर असल्याने या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता या गाड्यांना चालक-वाहक बदलीची झळ बसली आहे.

सकाळी सात ते आठ या वेळेत खोपोली नगर परिषद परिवहन सेवेची बसदेखील येत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करीत महामार्ग गाठावा लागतो. मिळेल त्या वाहनाने शाळा, कॉलेज गाठावे लागते. एसटीचा पास असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जलद एसटी बस खालापूर हे तालुक्याचे मुख्यालय असूनदेखील थांबत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या वेळेत असणारी एसटी बंद करण्यात आल्यामुळे शाळा, कॉलेजला वेळेत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना कष्टाचा प्रवास करावा लागत आहे. कर्जत पळसदरी मार्गे खोपोलीला जाणार्‍या गाड्या तरी खालापूर मार्गे याव्यात, अशी मागणी कर्जत डेपोकडे केली आहे.
-सुनील पंडित, कार्याध्यक्ष, खालापूर प्रवासी संघटना

एकाच वेळी वाहक-चालकांची बदली झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. महाड बस डेपोकडून काही वाहक, चालकांची कर्जतला नेमणूक झाली आहे. परंतु अद्याप ते हजर झाले नाहीत. याशिवाय प्रशिक्षण घेऊन नवीन चालकसुद्धा येणार आहेत. अजून पंधरा दिवस तरी प्रवांशाची गैरसोय होणार आहे.
-एस. पी. मोरे, वाहतूक नियंत्रक, कर्जत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -