घरमहाराष्ट्रवाहतूक कोंडी फोडण्यासाठी तरुणाई आक्रमक

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तरुणाई आक्रमक

Subscribe

तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर वर्षभरापासून सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे संतापलेली जनता आता आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी लोकप्रतिनीधींवर अवलंबून न राहता तरुण उत्स्फूर्तपणे आंदोलन करू लागले आहेत. काळे कपडे परिधान केलेल्या शेकडो तरुणांनी शनिवारी करळ फाटा येथे उत्स्फूर्तपणे मोटरसायकल रॅली काढून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचाही निषेध केला.

आम्र मार्ग (एनएच-348 ए), जेएनपीटी रोड (एनएच-348) आणि गव्हाणफाटा-चिरनेर (एसएच-104) या प्रमुख रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांची सुरू असलेली कामे, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि पोलिसांच्या आशीर्वादाने रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी होते. 15 मिनिटांचा प्रवास कराताना 4-4 तास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागते. या वाहतूक कोंडीमुळे उपचारासाठी नवी मुंबईच्या रुग्णालयात जाणार्‍या कित्येक रुग्णांना या वाहतूक कोंडीतच प्राण सोडावे लागल्याच्या संतापजनक घटना घडल्या आहेत. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागल्याचेही प्रकार घडले आहेत. तसेच मुंबई, नवी मुंबई येथे नोकरीसाठी जाणार्‍या अनेक तरुणांना या वाहतूक कोंडीमुळे नोकर्‍यांवर पाणी सोडावे लागले आहे.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम खाते व सिडकोचे दुर्लक्ष, पोलिसांचे वाहतूकदारांशी आर्थिक साटेलोटे, संबंधित यंत्रणांनी वाहतूक कोंडी संदर्भातील जनतेच्या निवेदनांना दाखविलेली केराची टोपली या व अन्य कारणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उग्र झाली आहे. यातूनच संतापलेल्या तरुणांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री अज्ञात तरुणांनी रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या शंभरहून अधिक वाहनांच्या टायरमधील हवा काढून काही वाहनांच्या काचाही फोडल्या. याला जनतेचाही छुपा पाठिंबा मिळू लागला आहे.

जेएनपीटीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येत असतात. ही वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा नसल्याने ती रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी केली जातात. वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे होत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या या वाहनांकडून ठराविक रक्कम पार्किंग फी म्हणून घेतली जाते. वाहतूक पोलिसांकडूनच वसूलीसाठी यासाठी माणसे ठेवली जातात. या माणसांनी वसूल केलल्या रकमेचा 30-70 टक्के प्रमाणे वाटणी केली जाते. काही वाहतूकदारांकडून पार्किंगसाठी महिन्याला ठराविक रक्कम ठरवून घेतली जाते. त्यामुळे या रस्त्यांवरची वाहतूक हटत नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर दस्तुरखुद्द एका वाहतूक पोलिसांनीच दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -