घरमहाराष्ट्रभ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍या दाम्पत्याला वाटते भीती !

भ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍या दाम्पत्याला वाटते भीती !

Subscribe

चौक ग्रामपंचायत प्रकरण

चौक ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या गावडे दाम्पत्याने भ्रष्टाचार्‍यांकडून जीवाला धोका असल्याचे पत्र पोलीस अधीक्षक आणि उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांना दिल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती. सुषमा गावडे ग्रामपंचायत सदस्या असताना त्यांनी एलईडी भ्रष्टाचार प्रकरण उचलून धरले होते. एलईडी बल्ब खरेदी प्रकरणात जास्त रकमेची निविदा स्वीकारण्यात आली असून, जादा दराने सर्व साहित्य खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात गावडे यांचे पती सुरेश गावडे यांनी आवाज उठवून या गैरकारभारात तत्कालीन ग्रामसेवक अनंतकुमार सूळ, सरपंच लता कोंडीलकर यांच्यासह त्यांना सामील ग्रामपंचायत सदस्यांविरोधात तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषदेपर्यंत लढा दिला. गावडे पती-पत्नी अलिबाग येथे बेमुदत उपोषणालादेखील बसले होते.

ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आढळल्याने अखेर कोकण आयुक्तांकडून ग्रामपंचायत बरखास्तीचे आदेश निघाले. 3 वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार्‍या गावडे दाम्पत्याचा अखेर विजय झाला. याप्रकरणी संपूर्ण चौकशीत ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आणि एलईडी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी उघड झाल्याने ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. या बरखास्तीनंतर नाचक्की झाल्याने दोषी ग्रामविकास अधिकारी आणि सदस्य जीवाला धोका निर्माण करू शकतात, अशी भीती गावडे दाम्पत्याने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

- Advertisement -

सावरोली ग्रामपंचायत भ्रष्टाचारावरून बरखास्त झाल्यानंतर सरपंचासह, सामील सदस्यांवर पंचायत समितीकडून गुन्हे दाखल झाले. त्यानंतर भ्रष्टाचार्‍यांना पोलीस कोठडीत बसण्याची वेळ आली होती. तशीच फौजदारी कारवाई चौक ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणातील दोषींवर व्हावी, अशी मागणी करीत असल्याने आमच्या जीवाला धोका आहे. आमचे काही बरेवाईट झाल्यास संबधितांना जबाबदार धरावे, असे पत्र दिले आहे.
– सुरेश दीनानाथ गावडे, चौक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -