घरमहाराष्ट्र"मेरिटनुसार निकाल आमच्याच बाजूने लागणार," CM Eknath Shinde यांना दृढ विश्वास

“मेरिटनुसार निकाल आमच्याच बाजूने लागणार,” CM Eknath Shinde यांना दृढ विश्वास

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपात्रता प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून मेरिटनुसार निकाल शिवसेना शिंदे गटाच्याच बाजूने लागणार, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा अंतिम निकाल आज (ता. 10 जानेवारी) जाहीर करण्यात येणार आहे. या निकालासाठी आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून मेरिटनुसार निकाल शिवसेना शिंदे गटाच्याच बाजूने लागणार, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुमत आमच्याकडे असल्याने निवडणूक आयोगाने आधीच अधिकृत शिवसेना हे नाव आणि शिवसेना पक्षाचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला दिले आहे, त्याचमुळे आजचा निकाल देखील आमच्याच बाजूने लागणार असे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून वारंवार सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… MLA disqualification result : विरोधकांच्या मनातील ‘शंकेची पाल’ खरी ठरणार की…, तर्कवितर्कांना उधाण

- Advertisement -

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर गेल्या तीन महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. याच प्रकरणाचा अंतिम निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्यासमोर भाष्य करणार आहे. तोपर्यंत मी एवढंच सांगेन की, शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने आम्हाला दिली आहे, तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने आम्हाला दिले आहे. विधानसभेत आमच्याकडे 67 टक्के बहुमत आहे आणि लोकसभेत 75 टक्के बहुमत आमच्याकडे असल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. पण काही लोकं यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. जे आरोप करतात त्यांचे काही लोक याआधी अध्यक्षांच्या दालनात जेवले आहेत. आम्ही त्यावर आक्षेप घेतला का? असा प्रश्न उपस्थित करत आमच्याकडे बहुमत असल्याने अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.

तर, रविवारी (ता. 07 जानेवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. निकालाच्या तीन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याने विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली. याबाबत स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी अध्यक्ष माझ्याकडे आले होते, पण ते त्यांच्या अधिकृत वाहनातून आले होते. अध्यक्ष रात्री लपून आले नव्हते, दिवसाच्या उजेडात आले होते. त्यांच्या मतदारसंघातील काही विषयांवर चर्चा करायची होती. ते पण एक आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात कोस्टल रोड प्रकल्प, मरिन्स लाईनला सुरू असलेली कामे व अन्य काही विकासाची कामे सुरू आहेत. त्याचबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली. मुळात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली, त्यामुळे ती अधिकृत बैठक होती. त्यामुळे आमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. एखाद्या संस्थेने त्यांच्या (विरोधकांच्या) बाजूने निर्णय दिला की ती संस्था चांगली असते, मात्र निर्णय विरोधात गेला की त्या संस्थेवर आरोप केले जातात, असा टोला शिंदेंनी लगावला आहे.

- Advertisement -

अध्यक्षांनी मेरिटवर निकाल द्यावा…

मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमच्यावर घटनाबाह्य असल्याचा आरोप करणारेच खरे घटनाबाह्य आहेत. कारण निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टानेही सांगितले आहे की, माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अस्तित्वात नव्हते. १६४ आमदारांचे बहुमत आमच्याकडे आहे. याशिवाय, गेल्या दीड वर्षांत आम्ही जी कामे केली. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. तर, आधी सरकार पडणार असे सांगितले जात होते. मात्र सरकार काही पडले नाही. नंतर मुख्यमंत्री बदलणार असे सांगत होते. अनेक ज्यातिषी आणले, पण सरकार काही पडले नाही. मुख्यमंत्रीही बदलला गेला नाही. आजही आमचा व्हिप त्यांना लागू आहे. त्यामुळे तशाच प्रकारचा मेरिटवरील निकाल आज आम्हाला अपेक्षित आहे, असे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -