घरमहाराष्ट्रगाळाने भरल्या रायगडच्या नद्या !

गाळाने भरल्या रायगडच्या नद्या !

Subscribe

किनार्‍यांवरील बांधकामांचा फटका, पुरामुळे कोट्यवधीचे नुकसान

रायगड जिल्ह्यातील नद्यांना दरवर्षी पूर येणे नवीन नसले तरी पूर येण्याचे प्रमाण वाढल्याने वारंवार जनजीवन विस्कळीत होण्याबरोबर कोट्यवधी रुपयांचे यात नुकसान होत आहे. नद्यांमध्ये साचलेला वारेमाप गाळ व नद्यांच्या आसपास मोक्याच्या जागांवर झालेली बांधकामे याला कारणीभूत ठरत आहेत. लोकप्रतिनिधी व शासन हा प्रकार मख्खपणे पहात आहेत.‘पावसाचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या रायगडात पावसाची सरासरी 3142.64 मिलिमीटर इतकी आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस अधिक प्रमाणात पडत असल्याने नद्यांना पूर येतो. यावर्षी काही ठिकाणी जुलैमध्ये दोन वेळा पूर येऊन गेला आहे. येणार्‍या पुरामुळे प्रचंड नुकसान होत आहे. आतापर्यंतच्या नुकसानीचा आकडा काढला तर तो काही अब्जांमध्ये जाईल. सरकारी आकडे पारंपरिक असल्याने खरे नुकसान कधी समोरच येत नसून मिळालेली भरपाई घेऊन गप्प राहण्याची वेळ नुकसान झालेल्यांवर येत आहे. त्यात पूर रेषेतील नुकसानग्रस्तांना विमा भरपाई मिळत नसल्याने झालेले नुकसान जनता, व्यापार्‍यांना स्वतःला भरून काढावे लागत आहे. वीज पुरवठा बंद होणे, रस्ते वाहतूक ठप्प होणे यात होणारे नुकसान प्रचंड आहे. मौल्यवान वेळ वाया जात आहे.

जिल्ह्यातील सावित्री, काळ, कुंडलिका, अंबा, चिल्हार, उल्हास नद्यांना अलिकडे वारंवार पूर येण्यामागे नद्यांतून साचलेला गाळ हे प्रमुख कारण आहे. गेले कित्येक वर्षे तेथील गाळाचा उपसा न झाल्याने नद्यांची खोली कमी होत चालली आहे. पावसाने संततधार लावली की यापैकी अनेक नद्यांना लगेचच पूर येत असतो. गाळ साचल्याने अंबा नदीतून धरमतर ते नागोठणे ही ऐतिहासिक ठरलेली लाँच सेवा बंद झाली. याचा अर्थ ही नदी गाळाने किती भरलेली असू शकते, याची कल्पना येते. सावित्रीमध्येही तिच परिस्थिती आहे. याशिवाय औद्योगिकीकरणानंतर जमिनींना सोन्याचे भाव आल्यामुळे मिळेल त्या जागेवर अधिकृत, अनधिकृत बांधकामे उभारण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. नद्यांतून होणारा पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळ्यांची शर्यत पार करीत समुद्राकडे सरकतो. नद्यांची धोक्याची पातळी गेल्या काही वर्षांत पाऊस पडल्यावर लवकर वाढते.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत असला तरी पाणी अडविण्याचे प्रभावी नियोजन नसल्याने साधारणतः नोव्हेंबरपासून अनेक भागात जनतेवर ‘पाणी-पाणी’ करण्याची वेळ येते. त्यामुळे आवश्यक तेथे नवीन धरणांची निर्मिती करणे, तसेच असलेल्या धरणांची उंची वाढविण्याचा प्रयत्न करण्याची मागणी अनेकदा झालेली आहे. मात्र दुर्दैवाने सत्ताधारी किंवा विरोधकांनी याबाबत कधीच गांभीर्य दाखविले नाही हे कटू वास्तव आहे.

दिल्लीत बोलणार..
जिल्ह्यात वारंवार येणारे पूर, त्यातून होणारे नुकसान याबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भूमिका समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता दिल्लीत जलसंधारण विषयावर मी नक्की बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर व त्यामुळे होणारे नुकसान हा विषय मी गांभीर्याने घेणार आहे. ठोस कार्यवाही होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत राहीन, असे ते म्हणाले.

गाळाने भरल्या रायगडच्या नद्या !
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -