घरमहाराष्ट्रउमरठ परिसराचा पर्यटनदृष्ट्याही विकास व्हावा..

उमरठ परिसराचा पर्यटनदृष्ट्याही विकास व्हावा..

Subscribe

तमाम इतिहासप्रेमींचे लाडके नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अनेक राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत तालुक्यातील उमरठ येथे साजरा होत असून, एकूणच वातावरण चैतन्यमय झाले आहे. मुख्यमंत्री येत असल्याने परिसरही नववधूसारखा नटला असून, त्यांच्या स्वागताचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यानिमित्ताने या ऐतिहासिक परिसराला काय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी ऐतिहासिक स्थळांना वारंवार भेटी देणार्‍या पर्यटकांचा विचार करून उमरठ आणि परिसराचा विकास होण्यासाठी त्यांनी भरभरून योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काही अंतरावर शिवरायांचा विशेष आवडता रायगड किल्ला, तर दुसर्‍या बाजूला तितकाच महत्त्वाचा असलेला प्रतापगड किल्ला यांच्या परिसरात वसलेला पोलादपूर तालुका शिवकालीन इतिहासाचा जसा साक्षीदार आहे, तसाच तो देखण्या पर्यटन स्थळांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणूनही ओळखला जातो. उमरठ येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येत शिवप्रेमी, पर्यटक येतात. मात्र त्यांचा इथपर्यंत पोहचण्याचा मार्ग खडतर आहे. आपल्याकडे पर्यटनाच्या विकासाच्या लंब्याचवड्या बाता मारल्या जातात. पण किमान मूलभूत सुविधा देण्याबाबतही कंजुषी केली जाते. उमरठमध्ये तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांचे समाधीस्थळ आहे. या परिसराचा खरं तर नियोजनबद्ध विकास होणे अपेक्षित होते. सोमवारच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार असल्यामुळे सर्व काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जाईल, जे खरं म्हणजे सिनेमातील सेटप्रमाणे असते.

- Advertisement -

उमरठमध्ये जिल्हा परिषदेचे विश्रामगृह आहे. बाकी सारा आनंद! तानाजी मालुसरे आणि शेलार मामांचे कर्तृत्व अतुलनीय आहे. अलीकडे आलेल्या तानाजी चित्रपटामुळे तानाजी मालुसरे यांची महती सार्‍या जगाला कळली. उशिराने का होईना, आता तानाजींची कर्मभूमी असल्याने उमरठसह पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांचा यानिमित्ताने विकास झाला पाहिजे, अशी सर्वांचीची अपेक्षा आहे. पर्यटन वाढीसाठी सिंहगडावरील शौर्याचा इतिहास माहित होण्यासाठी लाईट अँड साऊंड शोची व्यवस्था, शस्त्रांचे संग्रहालय, तंबू निवास, २४ तास पाणी, मोबाईल नेटवर्क, निवासाची व्यवस्था, वाहनतळ आदी सुविधा शासनाने करून दिल्या पाहिजेत. उमरठ गावाच्या पायथ्याशी नरवीरांचे धाकटे बंधू सुर्याजी मालुसरे आणि त्यांच्या सती गेलेल्या पत्नीचे स्मृतिस्थळ आहे.

या स्थळापासून अंदाजे 8 किलोमीटरवर कांगोरी गड आणि उमरठपासून 4 किलोमीटर अंतरावर चंद्रगड असे किल्ले आहेत. या दोन शिवकालीन गडांवर आवश्यक सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे. हा सर्व परिसर सह्याद्रीच्या डोंगररांगांचा, दर्‍याखोर्‍यांचा, तसेच धनदाट जंगलाचा असून, पक्षी आणि वन्य प्रेमी अभ्यासक, गिर्यारोहकांसाठी उपयुक्त आहे. तसेच गिर्यारोहकांसाठी उमरठ येथून दाभीळ गाव ते बहुलीचे टोक आणि तेथून प्रतापगड असा ट्रेकिंगचा मार्ग होऊ शकतो. या दृष्टीने विचार झाला पाहिजे. बोरज फाटा ते उमरठ गाव हा रस्ता अरूंद असून, अवघड वळणांचा आणि चढावाचा आहे. या रस्त्याचे रूंदीकरण आणि त्या अनुषंगाने अन्य सुधारणा गरजेच्या आहेत.

- Advertisement -

तानाजी मालुसरे यांचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी स्मृती दिन दणक्यात साजरा झाल्यानंतर मूलभूत सुविधांच्या आघाडीवर पुन्हा येरे माझ्या मागल्या असे होऊ नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सच्चे शिवभक्त आहेत. त्यांनी या सोहळ्याचे औचित्य साधून पर्यटनवृद्धीसाठी पोलादपूरला सढळ हस्ते निधी दिला तर खर्‍या अर्थाने या सोहळ्याची फलश्रृती ठरेल. योगायोगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही मूळचे पोलादपूरचे आहेत. त्यांनीही याकरिता पाठपुरावा करावा.

-बबन शेलार, पोलादपूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -