घरमहाराष्ट्रLoksabha 2024: महायुतीत नाशिक, अमरावतीत बंडाचे निशाण; सांगली, भिवंडीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

Loksabha 2024: महायुतीत नाशिक, अमरावतीत बंडाचे निशाण; सांगली, भिवंडीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात निवडणूक होणार आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात उर्वरीत चार टप्प्यातील जागा वाटप झालेले नाही. महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि महायुतीतील शिंदे गटाने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. तर नाशिक आणि अमरावतीमध्ये महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार बंडाचे निशाण फडकवण्याच्या पवित्र्यात आहेत.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सुरुवातीला शिवसेना फुटली तर नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी तर त्यांच्याविरोधात सत्ताधारी भाजप प्रणित महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी दुरंगी लढत बहुतेक मतदारसंघात होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्याची लढत स्पष्ट, आज उमेदवारी अर्ज दाखल 

राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 मार्च होती. नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, रामटेक या मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

नागपूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये चंद्रपूर हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता. मात्र बाळू धानोरकर यांचे निधन झाले आणि काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ पुन्हा रिक्त झाला. येथून आता पक्षाने बाळू धानोरकर यांच्या पत्नी विधान परिषदेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात भाजपने सुधीर मुनंगटीवार यांना मैदानात उतरवले आहे. भंडारा-गोंदिया येथून भाजपने सुनील मेंढे तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघात अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने अनुक्रमे डॉ. प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेव किरसान यांना उतरवले आहे.

- Advertisement -

रामटेक मतदारसंघ गेल्या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात होता, यंदा तो वाटाघाटीत काँग्रेसला सोडण्यात आला आहे. रामटेक मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे. मागीलवेळी एकत्रित शिवसेनेकडून विजयी झालेले कृपाल तुमाने यांच्या नावाला भाजपने विरोध केला. त्यामुळे महायुतीकडून काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिंदे गटात प्रवेश देऊन त्यांच्या हाती धनुष्यबाण देण्यात आला आहे. रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे काँग्रेसच्याच आमदाराला प्रवेश देत उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडीच्या जागेवरुन वाद

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका जागेवरुन अजुनही वाद सुरु आहे. सांगली हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ असल्याचा दावा केला जात आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने आज येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे सांगलीचे नेते दिल्लीत पोहचले. वसंतदादा पाटलांपासून या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेसची पकड ढिली झाली आहे. मात्र या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अजुनही समेट घडून आलेला नाही. अशीच परिस्थिती भिवंडी आणि मुंबई उत्तर मतदारसंघाबद्दल देखील आहे. मुंबई उत्तर पश्चिमध्ये ठाकरे गटाने दिलेले उमेदवार अमोल कीर्तिकरांविरोधात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी बोलायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची इच्छा होती की आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित तिन्ही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करावी. मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

महायुतीत नाशिकवरुन तिढा

महायुतीत शिंदे गटाने रामटेक सोडल्यास एकही जागा जाहीर केलेली नाही. नाशिक मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची आज दिवसभरापासून चर्चा आहे. त्यामुळे ते समर्थकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. वर्षावर त्यांची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा चालू आहे. नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात आहे. साताऱ्यातून उदयानराजे यांची उमेदवारी आजही जाहीर झालेली नाही. राजेंनाही भाजपने वेटिंगवर ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहाणार हे निश्चित होत नाही, अशी परिस्थिती आहे. मनसेला महायुतीत घेण्याची चर्चा अजून संपलेली नाही. त्यांना किती जागा देणार आणि कोणत्या याचीही चर्चा अजून सुरुच आहे.शिंदे गटाला नेमक्या किती जागा दिल्या जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचीही उमेदवारी ते जाहीर करु शकलेले नाहीत. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचे शेवटपर्यंत भिजत घोंगडे पडलेले दिसत आहे. अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिंदे गटाचे माजी खासदार आनंदरावर आडसूळ यांनी बंडाचे निशाण उभारले आहे. आमदार बच्चू कडू यांनीही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कालच भाजपचे स्थानिक पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर राणांविरोधात ठिय्या देऊन बसले होते. एवढा विरोध असताना आज भाजपने त्यांच्याहाती कमळ दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -