घरमहाराष्ट्रनेरळ बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा कहर !

नेरळ बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा कहर !

Subscribe

ग्रामपंचायत थंडावली, वाहतूक पोलीस गायब

येथे पदपथांबरोबर रस्त्यावर दुचाकीस्वारांनी राजरोस अतिक्रमण सुरू केल्याने रस्त्याची पायवाट बनल्यासारखी झाली आहे. परिणामी रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्त वाहनचालकांवरील ग्रामपंचायतीची कारवाई थंडावली असून, दुसरीकडे वाहतूक पोलीसदेखील दिसेनासे झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच उग्र बनली आहे.

22 कोटी रुपये खर्च करून शहरात काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते आता दुचाकीस्वारांसाठी पार्किंगची व्यवस्था होऊन बसले आहेत. आजूबाजूच्या गावांमधून येणारे दुचाकीस्वार रस्त्यावर वाहन उभे करीत असल्याने पादचार्‍यांना चालणे कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने टोइंग व्हॅनसह कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र नव्याची नवलाई संपली असून, कारवाई थंडावल्याने बाजापेठेत वाहतूक कोंडीची समस्या उग्र होत चालली आहे. बाजारपेठेत वाहन चालक बेशिस्तपणे वाहने उभे करीत असल्याने वाहतुकीस अडथळा तर निर्माण होतोच, शिवाय खरेदीला येणार्‍या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे.

- Advertisement -

यापूर्वी पार्किंगची व्यवस्था नसल्याने सर्वचजण पार्किंग व्यवस्थेच्या नावाने गळा काढत होते. परंतु मध्य रेल्वेने बाजारपेठेत मध्यभागी सुसज्ज पार्किंगची व्यवस्था केल्यानंतरही बेशिस्त वाहनचालक रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी उभी करण्यात धन्यता मानत आहेत. मात्र याकडे पोलीस आणि ग्रामपंचायतीचे, तसेच लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही. अनधिकृत पार्किंगमुळे बाजारपेठेला बकाल स्वरुप आले आहे. भाजी विक्रेते पदपाथ सोडून रस्त्यावर येऊन धंदा करीत आहेत. रस्तावर वेड्यावाकड्या अवस्थेत नेहमीच वाहने उभी केलेली असतात, तर रेल्वे स्टेशन परिसराला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पडलेला पहायला मिळतो.

या संदर्भात नेरळ ग्रामपंचायतीने अनधिकृत पार्क केलेल्या गाड्या उचलण्यासाठी आणलेली टोइंग व्हॅन का बंद करण्यात आली आहे. यासाठी सरपंच रावजी शिंगवा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असताना त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही.

- Advertisement -

नेरळ शहरात सध्या दोनच कर्मचारी आहेत, मीही रजेवर आहे. नेरळ ग्रामपंचायतीने टोइंग व्हॅन बंद केली आहे. त्यामुळे बाजारातील अनधिकृतपणे लावलेल्या गाड्या उचलल्या जात नाहीत. या अगोदर 6 वाहतूक कर्मचारी होते. एक निवृत्त झाले व दोघांची बदली झाल्यानंतर आता नवीन कोणी आले नसल्याने दोन कर्मचार्‍यांना संपूर्ण शहरावर लक्ष ठेवावे लावते, त्यामुळे अडचण निर्माण होत आहे.
– सुभाष पाटील, वाहतूक पोलीस, नेरळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -