गद्दारांची नजरेला नजर मिळवण्याची ताकद नाही

मनमाडच्या मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गरजले

मनमाड : गद्दारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून 40 गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाहीत. गद्दारांना उत्तरे देण्यास आपण कटिबध्द नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला, सत्तेत होते तेव्हा अडीच वर्षे गप्प का राहीले, असे अनेक प्रश्न युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटीर आमदारांना केले.

येथील साई प्रसन्ना लॉन्समध्ये आयोजित शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी मंचावर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जयंत दिंडे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, शहरप्रमुख मयूर बोरसे, पिंटू नाईक, संजय कटररिया, सुनील पाटील, राउफ मिरझा, रमेश हिरण, सुधाकर मोरे, मुक्तताई नलावडे, रेणुका जयस्वाल, सुनिता मोरे, संतोष जगताप, विजय करंजकर, सुनील बागूल उपस्थित होते. तेव्हा कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मनमाड शहराचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी उद्धव साहेबांनी 300 कोटी तातडीने मंजूर केले. या व्यतिरिक्तदेखील नांदगाव मतदारसंघाच्या विकासासाठी मीही मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. मात्र याचा विसर पडला. ते पुढे म्हणाले की, पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो, तो तुम्ही का पाळला नाही? उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही गद्दारी केली आहे. शिवसैनिक कदापि तुम्हाला माफ करणार नाहीत, असेही आदित्य म्हणाले. संवादप्रसंगी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. लॉन्सबाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी होती. सूत्रसंचालन संतोष जगताप, सुधाकर मोरे यांनी केले. संयोजन जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्त्यानी केले.