घरमहाराष्ट्रमालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण

मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण

Subscribe

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद** वाहनांची जाळपोळ * पोलीस, दुकानांवर दगडफेक * तीन पोलीस जखमी

त्रिपुरात मुस्लिमांवरील कथित हल्ले आणि मोहम्मद पैगंबरांबद्दल कथितपणे वापरण्यात आलेले अपशब्द याचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये हिंसक वळण लागले. या तिन्ही ठिकाणी जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक, वाहनांची जाळपोळ, दुकानांवर हल्ले केले. या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनाी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळपासून निषेध करण्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये मुस्लिमांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. दुपारनंतर मोर्चाला परवानगी नसतानाही या तिन्ही ठिकाणी मुस्लीम मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. मालेगावात बंद दुपारपर्यंत शांततेत पार पडत असताना दुपारनंतर हिंसक वळण लागले. अचानक काही भागातून तरुणांचे मोर्चे किदवाई रोडवरील शहीद टॉवरजवळ आले. यावेळी घोषणा देत तरुणांनी परिसर दणाणून सोडला होता. या घटनेने शहरात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे, पोलीस निरीक्षक धुसर आदी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळी पाचारण झालेल्या शीघ्र कृती दलाच्या जवानांसह वाहनांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लोखंडी जाळ्या लावून नाकेबंदी केली असता तरुणांनी जुन्या आग्रा रोडवर व्यापारी संकुलाकडे कूच करत दगडफेक सुरू केल्याने व्यापार्‍यांनी दुकाने बंद केली होती. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाठीमार करत जमावास पिटाळून लावले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

नांदेडमध्ये दुकाने फोडली
नांदेडमध्ये दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक भागांत दगडफेक केली. त्यात अनेक वाहने, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये मुस्लिमांकडून शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. तसेच निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जमावाकडून शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अचानक दगडफेक सुरू करण्यात आली. या दगडफेकीत अनेक चारचाकी गाड्या, दुचाकीचे नुकसान करण्यात आले. तसेच परिसरातील दुकानांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दुकानातील काचा फोडून वस्तूंचे मोठे नुकसान करण्यात आले.

- Advertisement -

अमरावतीत तीन पोलीस जखमी
अमरावतीत काढण्यात आलेल्या 15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चेकर्‍यांनी जयस्तंभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली. तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली. मोर्चा दरम्यान मोर्चेकर्‍यांनी भाजप आणि रा. स्व. संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात तीन पोलीस जखमी झाले.

शांतता राखा :- दिलीप वळसे-पाटील

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणार्‍या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. वळसे-पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -