घरमहाराष्ट्रशिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरेंचा शपथविधी

शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरेंचा शपथविधी

Subscribe

महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी संध्याकाळी ६. ४० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा होणार आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, शिवसेनेच्या अनेक बर्‍यावाईट घटनांचे साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांची प्रतिमा आणि शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आरूढ होणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील ४०० शेतकर्‍यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारले जात आहे. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपर्‍यात 20 एलईडी लावले जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीलाही सजवण्यात येत आहे

- Advertisement -

या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांना देण्यात आले आहे. मात्र ते या सोहळ्याला येणार नाहीत. त्यांच्या व्यतिरिक्त आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, जनता दल संयुक्तचे नितीशकुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोट, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

राज ठाकरेंनाही निमंत्रण
या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिश: फोनवरून राज ठाकरे यांना शपथविधीचे निमंत्रण दिले. त्यामुळे राज ठाकरे हेही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे समजते.

- Advertisement -

भव्यदिव्य शपथविधीची व्यवस्था

७० हजार – मैदानातील आसन व्यवस्था
३०० – व्यासपीठावरील आसन व्यवस्था
६,००० चौ. फूट – संपूर्ण व्यासपीठाचे क्षेत्रफळ
७०० – आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे कुटुंबीय
२००० – पोलीस कर्मचार्‍यांचे सुरक्षा कवच

हे नेते शपथविधीला उपस्थित राहतील

राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
चंद्राबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश
अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
एच.डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान

अजित पवारांबद्दल मी योग्य वेळी, योग्य तेच सांगेन. काळजी करू नका. -देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री.

भाजप सरकारला पाठिंबा देणे हे बंड नव्हते. मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि पुढेही असणार आहे. -अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -