घरमहाराष्ट्रतर मुंबईत चालणे, बोलणेही अवघड होईल

तर मुंबईत चालणे, बोलणेही अवघड होईल

Subscribe

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या राड्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. नारायण राणे यांनी सोमवारी सकाळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची दादर येथील निवासस्थानी भेट घेतली.

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या राड्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. नारायण राणे यांनी सोमवारी सकाळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची दादर येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. असे हल्ले करू नका, नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणे, बोलणे, फिरणे अवघड होईल; त्यासाठी परवानगीची गरज लागेल, असा इशाराही राणे यांनी यावेळी शिवसेनेला दिला.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, सध्या आमची युती आहे, मात्र युतीपेक्षाही सरवणकर आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचे मार्केटिंग करण्याशिवाय दुसरे काही काम त्यांच्याकडे उरलेले नाही, पण असले हल्ले-बिल्ले करू नका, आम्ही धांगडधिंग्याची दखल घेत नाही, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? नाहीतर परवानगी घ्यावी लागेल. सोबतच शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेईल, धनुष्यबाण चिन्हही त्यांनाच मिळणार, असा विश्वासही यावेळी राणेंनी व्यक्त केला.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात झालेल्या राड्याचे प्रकरण चिघळले आहे. राड्यानंतर दादर पोलिसांनी ५ शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हे शिवसैनिक थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला, तर सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केल्यावर पोलिसांनी सरवणकर यांच्यावर गुन्हा नोंदवत त्यांची पिस्तूल ताब्यात घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिंदे सरकार बरखास्त करा : दानवे
केंद्रातील मंत्री नारायण राणे हे थेट दादागिरी करत धमकी देत आहेत. शिंदे फडणवीस यांचे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असेल, तर असे दादागिरी करणारे सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केली.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात सदा सरवणकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचे आहे ना, अशा धमक्या देत असतील, तर राज्यातील हे सरकार गुंडांचे सरकार आहे का, असा सवाल करत दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत. ते जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नसतील आणि अशाप्रकारे गुंडगिरी, दादागिरी होत असेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे दानवे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -