घरमहाराष्ट्रमराठी माणसाचा फक्त निवडणुकीपुरता वापर

मराठी माणसाचा फक्त निवडणुकीपुरता वापर

Subscribe

मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी माणसाच्या दुरवस्थेसाठी शिवसेनेला जबाबदार धरत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादच्या दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आमदार संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील सभेला संबोधित केले.

शिवसेनेला मराठी माणसाचा एवढाच पुळका होता, तर शिवसेनेची सत्ता असताना मागील काही वर्षांमध्ये मुंबईतील मराठी माणूस बाहेर का फेकला गेला, या प्रश्नाचे आधी उत्तर द्या. हिंमत असेल तर सद्यस्थितीत मुंबईत किती मराठी माणसं उरलीत, याची आकडेवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून जाहीर करा, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी माणसाच्या दुरवस्थेसाठी शिवसेनेला जबाबदार धरत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादच्या दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आमदार संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील सभेला संबोधित केले.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे सहकारी होऊ. आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणार्‍यांची आम्ही त्याच साबणाने धुलाई केली, असे जोरदार प्रत्युत्तरही विरोधकांना दिले. सोबतच अजित पवारांच्या नाराजी नाट्यावर भाष्य केले.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई आपली आहे. मराठी माणसांची आहे, शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजप काम करत असल्याचा बिनबुडाचा आरोप केला जात आहे. सामनातील ‘रोखठोक’ सदरातून आमच्यावर सतत टीका केली जाते, पण मराठी माणसाचा एवढाच पुळका आहे तर त्याच सदरातून तुमची सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस का बाहेर फेकला गेला? मराठी माणसाला वांगणी, बदलापूर, विरारला का जावे लागले, याचे विश्लेषण करा, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

शिवसेना केवळ निवडणूक आली की मराठीचा मुद्दा पुढे आणते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा डाव असल्याचे सांगितले जाते, पण हे सगळे फक्त निवडणुकीपुरतेच बोलले जाते. निवडणूक संपली की मराठी माणूस देशोधडीला का लागला, मुंबईतील मराठी टक्का कमी का झाला, याकडे कोणीही लक्ष देत नाही. आता तुम्ही जसे मुलुंड, भांडुप, दादर आणि परळ भागातील घराघरांमध्ये जात आहात, तसे आधीच गेले असतात तर मुंबईतील मराठी टक्का कमी झाला नसता, मात्र आधी मराठी माणसांचा वापर करायचा आणि नंतर खापर दुसर्‍यांवर फोडायचे, ही तुमची रणनीती आमच्या लक्षात आली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

- Advertisement -

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदेंची सेना लाचार आहे, असे म्हटले जाते. एकनाथ शिंदे हे केवळ बुडबडा आणणारा साबण आहे, असे म्हटले जाते, पण याच साबणाने तुमची धुलाई केली आहे, हे लक्षात असू द्या, असा टोला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला.

टीका करणे हाच विरोधकांचा धंदा
विरोधकांच्या शब्दकोषात खोके आणि गद्दारी हे दोनच शब्द उरले आहेत. आधी दादा टीका करत होते, आता ताईपण सुरू झाल्यात. कोणी वंदा, कोणी निंदा टीका करणे हा विरोधकांचा धंदा. दिल्लीत झालेल्या बैठकीत दादांना भाषण करू दिले नाही, पण हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या नाराजीवर भाष्य केले.

आम्ही मोदींचे हस्तक असल्याची टीका झाली, परंतु दाऊद-मेमन या गद्दार आणि देशद्रोही लोकांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार पुढे नेत ३७० कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे हस्तक होणे केव्हाही चांगले, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

मराठीच्या मुद्द्यावरच तुम्ही मोठे नेते झाला
मराठी माणसाच्या मुद्द्यावरच तुम्ही एवढे मोठे नेते झाला आहात. नाहीतर अजूनही ठाण्यात रिक्षा चालवत असता. तुम्ही आज ज्या बंगल्यात राहता, ते याच मराठीच्या मुद्द्यावर. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१२ ते २०२२ या काळात तुमच्यावर जबाबदार्‍या टाकून तुमचे नेतृत्व फुलवले, तुम्हाला संधी दिली, मनमोकळेपणाने काम करण्याची संधी दिली. तुम्ही मराठीच आहात ना? तसे नसेल तर सांगा. मुंबईत लोकसंख्या वाढली, कुटुंब मोठी झाल्याने घराचे आकारमान कमी पडू लागले. त्यामुळे मराठी माणसं ठाण्यात गेली. तिथंही तुमच्यासारख्यांनी त्यांना ओरबाडून खाल्ले, असे प्रत्युत्तर खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -