घरदेश-विदेशसामान्य चेहर्‍याचा असामान्य कलाकार

सामान्य चेहर्‍याचा असामान्य कलाकार

Subscribe

‘एक डॉक्टर की मौत’मध्ये तो पडद्यावर दिसलेला इरफान खान, मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’मध्ये झळकला, त्यावेळी जेमतेम २० वर्षांचा होता. त्याचा सहज सुंदर अभिनय, मोठे आणि बोलके डोळे हे त्याचे वैशिष्ट्य होते. छोट्या पडद्यावर ‘चंद्रकांता’ मालिकेत इरफानने धाडसी शूर सरदाराची केलेली भूमिका गाजली होती. स्टार प्लसच्या ‘शू… कोई है…’, ‘रिश्ते’, अशा मालिकांमध्ये त्याने मिळेल त्या छोट्या मोठ्या भूमिका केल्या. महेश भट्टने इरफानला ‘रोग’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले. पूजा भट त्याचे दिग्दर्शन करत होती.

इरफान उत्तम अभिनेता आहे; पण हिंदी सिनेमाचा हिरो होईल का? अशी शंका त्यावेळी सिनेवर्तुळात उपस्थित केली गेली होती. हा चित्रपट पोस्टरपासूनच वादग्रस्त ठरला आणि महेश भट्टवर होणार्‍या एका गटाच्या टोकदार टीकेचा इरफारनही वाटेकरी झाला. पण इरफानने त्याची कधीही पर्वा केली नाही. इस्लाम धर्माविषयी सडेतोड मत व्यक्त करताना त्याला स्वधर्मातील कट्टरवादी समूहांच्या टिकेलाही सामोरे जावे लागले. विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’ने इरफानच्या डोळ्यांपासून अभिनयापर्यंत सर्वच पैलूंना न्याय दिला. म्हणूनच हा सिनेमा भारतातील पहिल्या पाच दर्जेदार सिनेमांमध्ये गणला जातो.

- Advertisement -

मराठी दिग्दर्शक निशिकांत कामतसोबत इरफानने ‘मदारी’ केल्यावर त्याचे कौतुक होणारच होते. समांतर सिनेमा किंवा कलात्मक चित्रपटात पंकज कपूर, नसिरुद्दीन शहा आणि ओम पुरीनंतर कोण?..असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याला इरफान हे एकमेव उत्तर होते. व्यावसायिक आणि वास्तववादी, कलात्मक, समांतर, विद्रोही, तद्दन गल्लाभरू अशा कुठल्याही मर्यादा इरफान खानच्या अभिनयाला नव्हत्या. एकीकडे ‘लंच बॉक्स’ सारखा भावनिक संवादपट करत असताना निव्वळ व्यावसायिक सिनेमात इरफान सहनायक, खलनायकही रंगवत होता. शाहरुखच्या महत्त्वाकांक्षी ‘बिल्लू बार्बर’मध्ये इरफानने बिल्लू केस कापणार्‍याची भूमिका अशी रंगवली की इरफान पडद्यावर असल्यावर मला माझ्या अभिनयाच्या मर्यादा जाणवतात असे शाहरुखने म्हटले होते.

‘पान सिंह तोमर’मध्ये भूमिकेच्या दोन शेड्स होत्या. व्यवस्थेने संपवलेला खेळाडू आणि निर्माण झालेला खतरनाक डाकू हे दोन्ही टोकाचे बदल साकारणारा इरफानच होता. ‘लाईफ ऑफ पाय’मुळे हॉलिवूडमध्येही इरफानचा दबदबा होता. मोठाल्या वेब सीरीजवरही इरफान झळकत होता. खूप सारे नवे प्रोजेक्ट्स समोर असताना इरफानला दुर्मिळ अशा कर्करोगाने ग्रासले. मधल्या काळात अमेरिकेत जाऊन त्याने उपचारही घेतले. त्यावेळी उपचारादरम्यान तो म्हणाला होता ‘आयुष्य, आपलं काम, आनंद आणि जगणंही किती क्षणभंगुर असू शकतं याचा अनुभव मी घेतोय’! आज हिंदी आणि इंग्रजी रुपेरी पडद्यावरच्या झगमगाटात एक सामान्य माणसाचा चेहरा असलेला असामान्य अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.

- Advertisement -

इरफान खानचा अलविदा

दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४व्या वर्षी निधन झाले आहे. २०११मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचा गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा सुरू होता. त्याचसाठी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच २५ एप्रिल रोजी त्यांच्या आईचे देखील निधन झाले होते. मात्र, करोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून त्यांचे अंतिम दर्शन घेतले होते. मात्र, आता खुद्द इरफान खान यांच्याच निधनाच्या वृत्तामुळे चित्रपटसृष्टीवर दु:खाची शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे एक अष्टपैलू अभिनेता हरपल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.

‘अंग्रेजी मीडियम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या हिंदी मीडियम या चित्रपटाचा तो सिक्वेल होता. त्यांच्या मकबूल, पीकू, द लंच बॉक्स, हिंदी मीडियम अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची छाप त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर सोडली होती. मूळचे जयपूरचे असलेले इरफान खान यांनी दिल्लीच्या एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करून आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पान सिंह तोमर या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१८मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर काही महिने उपचार केल्यानंतर त्यांनी कमबॅक देखील केलं होतं. त्यानंतर त्यांनी अंग्रेजी मीडियम हा चित्रपट देखील केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत आज दुपारी मालवली. त्यांच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीसोबतच इतर क्षेत्रातल्या मान्यवरांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -