घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या अंतर्गत यादीचा वापर सत्तास्थापनेसाठी

राष्ट्रवादीच्या अंतर्गत यादीचा वापर सत्तास्थापनेसाठी

Subscribe

अजित पवारांना बहुमत अशक्य

राष्ट्रवादीने सदस्यांच्या स्वाक्षर्‍यांसह तयार केेलेली अंतर्गत यादी अजित पवारांनी सत्तेचा दावा करण्यासाठी वापरली असावी, असा अंदाज शरद पवारांनी यशवतंवराव चव्हाण सेंटरमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. अजित पवारांनी जे केले ते योग्य नाही. शिवाय त्यांना बहुमत सिद्ध करता येणारच नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. अजित पवारांवरील कारवाईबाबत पक्षीय बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

अजित पवार यांनी पक्षनेत्यांना अंधारात ठेवून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षाच्या बैठकीत निर्णय घेऊन कारवाईचे संकेत दिले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तयारी केली होती. आमच्याकडे बहुमताची आकडेवारीसुद्धा होती. शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४, काँग्रेसचे ४४ असे आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले आणि आम्हाला व काँग्रेसला पाठिंबा दिलेल्यांची संख्या १६९ वर जात होती. यासंदर्भात कालच आमची बैठक झाली, चर्चा झाली.

- Advertisement -

मात्र, सकाळी पावणे सात वाजता आमच्या सहकार्याने टेलिफोनद्वारे सांगितले की, आम्हाला राजभवन येथे आणले आहे. मला राज्यपाल सर्व कार्यक्रम सोडून तयार आहेत याचे आश्चर्य वाटले. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही सदस्य गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरणाविरोधात आहे. हा शिस्तभंगाचा निर्णय होता. असे असले तरी आमचा प्रामाणिक कार्यकर्ता त्यांच्याकडे जाणार नाही. जे सदस्य गेले त्यांना कशासाठी जात आहोत याची पूर्ण माहिती नसावी.

प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांच्या स्वाक्षर्‍या घेऊन याद्या तयार ठेवलेल्या असतात. राष्ट्रवादीकडेदेखील तशी यादी होती. यातील दोन याद्या अजित पवारांनी कार्यालयातून घेतल्या. त्याच याद्या त्यांनी राज्यपालांना सत्तास्थापनेसाठी दिल्या असाव्यात. मात्र, त्यावर जर सरकार स्थापन झाले असेल, तर त्या कार्यालयीन उपयोगासाठीच्या सह्या होत्या. त्यावर ५४ स्वाक्षर्‍या होत्या. पाठिंबा असल्याचे भासवत ही यादी सादर केली असेल तर राज्यपालांची चूक होण्याची शक्यता आहे, असेही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

..तर तीनही पक्ष एकत्र येऊन पराभव करणार
जे नव्या सरकारकडे गेले किंवा कुणी जाणार असेल तर त्यांनी या देशात पक्षांतर बंदीचा कायदा लागू आहे याचाही विचार करावा. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, राज्यात भाजप सरकार येण्यास जनतेचा कठोर विरोध आहे. त्यामुळे मतदार अशा निर्णयांना पाठिंबा देणार नाही. कुणी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीनही पक्ष एकत्र येऊन त्या व्यक्तीचा पराभव कसा करायचा याची काळजी घेऊ, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

पक्षाबाहेर पडणार्‍यांना नाकारलेच जाते
१९८० च्या निवडणुकीत ५८ आमदार आमच्याबरोबर होते. पाच वर्षात आम्ही सहाच जण उरलो. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पक्षातून बाहेर पडलेले सगळेच पराभूत झाले. याउलट आमच्या आमदारांची संख्या या निवडणुकीत वाढली होती, अशी आठवण यावेळी शरद पवार यांनी सांगत पक्षातून बाहेर पडून काहीही उपयोग होत नाही, असे स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले
– अजित पवारांचा निर्णय शिस्तभंगाची कारवाई करावी असा आहे
– गैरसमजातून कोणी गेले असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही, परंतु जाणूनबुजून गेले असतील तर नक्की        कारवाई केली जाईल
– कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस तयार आहे
– रात्रीच्या वेळी राज्यपालांच्या वाढलेल्या कार्यक्षमतेचे मला कौतुक वाटते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -