घरक्रीडाफक्त गुणांसाठी क्रिकेट नको!

फक्त गुणांसाठी क्रिकेट नको!

Subscribe

पिंक बॉल (गुलाबी चेंडू) टेस्टची चर्चा सध्या सर्वत्र सुरू होतेय हे ठीक आहे, पण कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होत असलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या पिंक बॉल डे-नाईट टेस्टच्या पहिल्या दिवशीच चित्र स्पष्ट झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसरी कसोटी जिंकत विराट कोहलीचा भारतीय संघ ६० गुण खिशात टाकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३६० गुणांसह अव्वल स्थान कायम राखणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील या एकतर्फी झुंजीबाबत, तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत भारताचा माजी कर्णधार, शैलीदार फलंदाज ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’ दिलीप वेंगसरकरने काही रोखठोक मते मांडली.

क्रिकेटमध्ये बदल अपेक्षित आणि गरजेचे आहेत. त्यांना माझा विरोध नाही. कसोटी क्रिकेटसाठी प्रेक्षकांची पावले स्टेडियमकडे वळायला हवीत यात काहीच शंका नाही. नव्या बदलांचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यामुळे पिंक बॉल टेस्टबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वप्रथम पिंक बॉल टेस्ट अ‍ॅडलेड ओव्हलवर खेळवली गेली ती २०१५ मध्ये! त्याला चांगला पाठिंबा लाभला, परंतु वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत मात्र तसे म्हणता येणार नाही. मला तरी याबाबत खात्री वाटत नाही. कसोटी क्रिकेट निश्चितच रंजक व्हायला हवे. मात्र, केवळ गुण कमावण्यासाठी क्रिकेट खेळले जाऊ नये, असे दिलीपला वाटते.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात, इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्यात खरी मर्दुमकी आहे. अडथळ्यांवर मात करून यश मिळवणे कधीही श्रेयस्कर. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गुणपद्धती सदोष आहे. ‘गुण कमवा आणि फायनल खेळा’, असे होता कामा नये. कसोटी क्रिकेटमध्ये द्वंद्व रंगतात. त्याची रंगत, शान काही औरच! त्यातच खरी रंजकता, थ्रिल आहे, असे दिलीप म्हणतो.

परदेशात जेव्हा संघ सामना खेळतो, तेव्हा तो यजमान संघावर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरतो. परंतु, आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गुण मिळवण्याचा विचार मनात डोकावतो आणि नेमकी हीच बाब मला रुचत नाही. कसोटी क्रिकेट हे दोन संघांतील द्वंद्व आहे. ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियात विजय मिळवणे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपपेक्षा कधीही गौरवास्पद! भारतीय संघांचीही अशीच धारणा असेल, असे दिलीप निर्धारपूर्वक सांगतो. पिंक बॉलने खेळण्यात खेळाडूंना फारशी अडचण असणार नाही, असे त्याला वाटते. पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला. त्यावेळी भारतीय संघाला टी-२० क्रिकेटचा फारसा अनुभव नव्हता, याकडे दिलीप लक्ष वेधतो. व्यावसायिक क्रिकेटपटूंना बदल अंगवळणी पडण्यास फारसा वेळ लागत नाही, असे तो म्हणतो.

- Advertisement -

कसोटी सामने पाचऐवजी चार दिवसांचे खेळले जावेत का, असे विचारले असता दिलीप सांगतो, का नाही? जुन्या जमान्यात कसोटी सामने ३ दिवसांचे होत असत. पुढे त्याचा कालावधी ४ दिवसांचा करण्यात आला. त्यानंतर ५ दिवसांच्या कसोटी सामन्यांना सुरुवात झाली. आता कसोटी सामने निकाली ठरतात. ते ३-४ दिवसांतच आटोपतात. त्यामुळे बदल करण्यास काहीच हरकत नाही.

कसोटी क्रिकेटची रंजकता वृद्धिंगत राहण्यासाठी कोणते अतिरिक्त बदल करता येतील, असे विचारले असता दिलीपने सांगितले, डे-नाईट विद्युतझोतातील कसोटी सामन्यांमुळे क्रिकेटला चालना मिळेल. त्यामुळे प्रेक्षक सामने पाहायला स्टेडियममध्ये येतील. परंतु, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खेळपट्ट्या जर चांगल्या असतील, तर कसोटी क्रिकेट निश्चितच फोफावेल. चांगल्या खेळपट्टीमुळे तेज आणि फिरकी गोलंदाजांप्रमाणेच फलंदाजांना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळू शकेल.

भारतातील खेळपट्ट्यांमध्ये आता खूप सुधारणा झाली आहे असे सांगून दिलीपने अलीकडेच झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यांचा उल्लेख केला. इंदूरची खेळपट्टीदेखील उत्तम होती, जिथे भारताने बांगलादेशचा पराभव केला, याकडेही त्याने लक्ष वेधले. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबाबत मात्र त्याने साशंकता व्यक्त केली. तीन दिवसांपेक्षा जास्त ईडनची खेळपट्टी टिकणार नाही, असे दिलीपला वाटते. त्याचे स्मितहास्यच सारे काही सांगून जात होते.

-शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -