कुणी बेड देतं का बेड

Subscribe

रुग्णांच्या नातेवाईकांची आर्त हाक; शहरातील सर्वच हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर बेड फुल्ल

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना नाशिक शहरात व्हेंटिलेटर बेड मिळणे मुश्किल झाले आहे. ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने सुमारे २५ हॉस्पिटल्सकडे बेडसाठी विचारणा केली. मात्र बेड उपलब्ध नसल्याचे सर्वच्या सर्व हॉस्पिटल्स व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त बाहेरच्याही जिल्ह्यातील रुग्णांना आता नाशकात उपचारासाठी आणले जात आहे. या रुग्णांनाही बेड मिळणे दुरापास्त होत आहे. परिणामी नटसम्राट चित्रपटातील ‘कुणी घर देतं का घर’ या संवादाप्रमाणे ‘कुणी बेड देतं का बेड’ अशी आर्त हाक रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावी लागत आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांचा उपचारांसाठी आता महापालिकेसह खासगी रुग्णालयांकडे कल वाढत चालला आहे. दुसरीकडे गेल्या वर्षाप्रमाणेच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट सुरू झाल्याच्या तक्रारी महापालिकडे वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के व २० टक्के बेडचे वर्गीकरण कायम ठेवले असले, तरी मधल्या काळात रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता पुन्हा ८०-२० फॉर्मुल्याबाबत कडक निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे ८० टक्के बेडवरील रुग्णांवर सरकारी दराने, तर २० टक्के राखीव बेडवर रुग्णालय बिल आकारणार आहे. गेल्या वेळेस खासगी रुग्णालयांनी याबाबत टाळाटाळ केल्यानंतर महापालिकेने रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या, एकूण रुग्णसंख्या आणि सरकारी दरफलक रुग्णालयाबाहेर लावण्याचे बंधनकारक केले होते. त्यानुसार रुग्णालयांनी कार्यवाहीही केली होती. परंतु, आता पुन्हा याच तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दर नियंत्रण समितीने शहरातील ज्या खासगी रुग्णालयांत करोना बाधितांवर उपचार केले जात आहेत त्या रुग्णालयांच्या दर्शनी भागात महापालिकेने निश्चित केलेले दरफलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच ८०-२० टक्के फॉर्म्युल्यानुसार रुग्णालयातील बेड संख्येचे अपडेट दर तासाला रुग्णालयाबाहेर लावण्याचे निर्देशही दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही, तर कायदेशीर कारवाईचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत हॉस्पिटल्सने आपली मनमानी सुरु केलेली दिसते. मृत्यूदर वाढू नये म्हणून गंभीर अवस्थेतील रुग्णांना कोणी दाखलच करुन घेताना दिसत नाही. काही हॉस्पिटल्सने बेडच्या आगाऊ नोंदणीसाठी पाच लाखांपर्यंतचे अनधिकृत शुल्क उकळायलाही सुरुवात केली आहे. वास्तविक, आरोग्य विभागाने २१ मे २०२० ला जारी केलेल्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना सर्वसाधारण बेडसाठी चार हजार रुपये, अतिदक्षता विभागातील बेडसाठी साडेसात हजार रुपये, तर व्हेंटिलेटर बेडसाठी नऊ हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे दर निश्चित करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून महापालिकेने ०२५३-२३१७२९२ किंवा ९६०७४३२२३३ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. महापालिकेच्या किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्यास ९६०७६२३३६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक महापालिका

खासगी रुग्णालयांनी आरक्षित ८० टक्के बेड व स्वत:कडील २० टक्के बेडवरील रुग्णसंख्येबाबत दर तासाला रुग्णालयांबाहेर फलक लावून अपडेट करण्याचे बंधन घातले आहे. सोबतच ८० टक्के बेडवरील उपचारांसाठी दरदेखील रुग्णालयाच्या बाहेर दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बोधिकिरण सोनकांबळे, महापालिकेच्या दर नियंत्रण समितीचे प्रमुख

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -