घर महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नसल्याने..., विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नसल्याने…, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

Subscribe

जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन पोलिसांकडून चिरडण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत असल्याने विरोधकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Jalna Maratha Protest : राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला काल (ता. 01 सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना पोलिसांनी अटक करीत उपस्थितांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करण्यात येत होते. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात पसरले असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. काल झालेल्या या घटनेनंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काही भागात जाळपोळ करण्यात आली. ज्यामुळे आता मराठा आंदोलक हे हिंसक झालेले पाहायला मिळत आहे. (Vijay Wadettiwar accuses the government after the incident of Maratha protesters in Jalana)

हेही वाचा – जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज

- Advertisement -

या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्याकडून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवारांकडून करण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी केली आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर गेल्या वर्षभरात या सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. मराठा समजााकडून स्वतःच्या हक्कासाठी हे आंदोलन होत असताना लाठीचार्जसारखी दुर्दैवी घटना घडली. या पूर्वी देखील मराठा आंदोलकांकडून पाच लाख संख्या असलेले, 10 लाख संख्या असलेले मोर्चे काढण्यात आले होते. मराठा समाजाकडून शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. पण काल जी घटना घडली ती दर्शवते की या सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही. या सरकारने निवडणूक लढविण्याकरता फक्त मराठा आरक्षणाबाबतची घोषणा केली होती. त्यामुळेच त्यांना या सर्व परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी मराठा समाजावर लाठी उगारली, ज्यामध्ये आता एक महिला गंभीर झाली असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच, आरक्षणासंदर्भात सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार नाही, असे आमच्याकडून याआधी देखील सांगण्यात आले होते. पण या सरकारने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा निर्णय घेत मराठा समाजाची दिशाभूल केली. आज त्याचाच प्रत्यय जालन्यात आला आहे. आरक्षण देऊ शकत नसल्याने जालन्यातील हे आंदोलन चिरडण्याचा, आंदोलकांना हुसकविण्याचा काल प्रयत्न करण्यात आला, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

त्यामुळे जालन्यातील घटनेची सरकारने निपःक्ष चौकशी करवी, मराठा समाजाची माफी मागावी आणि विशेष करून हे गृहखात्याचे अपयश असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांच्या वतीने विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, सरकार जर आरक्षण देणार असेल तर ते कधीपर्यंत आणि नसेल देणार तर त्यासाठी दुसरा पर्याय काय? हे सरकारने मराठा समाजासमोर स्पष्टपणे मांडावे, अशी भूमिका असल्याचे विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले.

- Advertisment -