घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदहावी सहावेळा अनुत्तीर्ण होऊनही मिळवली "पीएचडी"

दहावी सहावेळा अनुत्तीर्ण होऊनही मिळवली “पीएचडी”

Subscribe

नाशिक : उंच शिखर चढून जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वाटेतील खाचखळगे, काटेकुटे, अनेक अडसर सोपे वाटू लागतात आणि एक दिवस असा येतो की अवघड वाटणारे हे शिखर अत्यंत सहजतेने पार केले जाते. ही कथा आहे नाशिकच्या प्रशांत भरवीकर या ध्येयवेड्या तरूणाची दहावीमध्ये सहा वेळा गटांगळ्या खाणार्‍या या तरूणाने मनात जिद्द ठेवली की पीएच.डी. व्हायचे व मग काय ‘आकांक्षापुढती जेथ गगन ठेंगणे’ ही उक्ती त्याने सार्थ करून दाखवली.

प्रशांत दामोदर भरवीरकर याचे मूळ गाव ओझर (मिग) परिस्थितीचे चटके सहन करत दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. मात्र, अचानक हरवलेले पित्याचे छत्र आणि दुर्बल आर्थिक परिस्थिती यामुळे दहावीला त्याच्या पदरी अपयश आले. एक-दोनदा नव्हे तर तब्बल सहावेळा प्रयत्न करूनही त्याच्या पदरी अपयशच पडले. मात्र म्हणतात ना, जिद्द असेल तर आंधळ्यालाही वाट गवसते. आईने दिलेले धैर्य आणि शिक्षणच आपल्याला तारणार आहे या प्रेरणेने कसून अभ्यास करत प्रशांतने मनाशी काही गोष्टी निश्चित केल्या आणि सहाव्या वेळी तो चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला. मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. ओझरच्या महाविद्यालयात अकरावीला पहिला, बारावीला दुसरा येत त्याने शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा अटकेपार झेंडा लावला.

- Advertisement -

कॉलेजची तिन्ही वर्षे अतिशय चांगले यश मिळवत बी.ए.ला डिस्टिंक्शन, डबल एमए केले. पत्रकारितेचा अभ्यासक्रम बीसीजे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत एम.फिल. (विद्यापती) ही पदवी प्राप्त केली. पुढे राष्ट्रीय स्तरावरची मराठीतील सहायक प्राध्यापक पदाची परीक्षा (नेट) उत्तीर्ण होऊन थेट पीएच.डी.ला प्रवेश मिळवला आणि पाच वर्षे अथक परिश्रम करत शिक्षणातील सर्वोच्च पदवीवर आपले नाव कोरले.

आयुष्यात आलेल्या थोड्या अपयशाने खचून जात आत्महत्या करणार्‍यांसाठी हा नक्कीच दीपस्तंभ ठरावा. आज संपूर्ण महाराष्ट्राला लेखक, कवी, गीतकार व सुप्रसिद्ध पत्रकार म्हणून प्रशांत भरवीरकर हे नाव परिचित आहे. ‘वर्तमानाच्या लिपीत’ काव्यसंग्रह, ‘दिसामाजी’ ललित लेखसंग्रह, ‘अवलियांचे जनस्थान’ हे संशोधनपर पुस्तक, ‘मर्म भक्तियोगाचे’ हे ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायाचे निरूपण ही चार पुस्तके त्याच्या नावावर आहेत.

पीएच.डी.च्या या यशामागे माझ्या चौथी शिकलेल्या परंतु शिक्षणाचे महत्त्व जाणून असलेल्या आईची प्रेरणा आहे. तिने मला सहा वेळा दहावीची परीक्षा द्यायचे बळ दिले. शिक्षणासाठी स्वत:चे आयुष्य पणाला लावून, वेळप्रसंगी मोलमजुरी करून शिकवले. आज ती हवी होती. तिच्या प्रेरणेने मिळालेली ही डॉक्टरेट मी तिलाच अर्पण करतो. : डॉ. प्रशांत दामोदर भरवीरकर

- Advertisement -

अध्यात्माने दिले यशोशिखर गाठून

एखादी गोष्ट निश्चित केल्यानंतर त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मनाची एकाग्रता महत्त्वाची असते आणि ती मिळवण्यासाठी प्रशांतला आधार दिला तो अध्यात्माने. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार याचा अंगीकार करत मनाला बळ देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील समाधीस्थळांचा शोध घेत, त्यांचा कसून अभ्यास केला. यातून संतांच्या चरित्राच्या अभ्यासाला वाट मोकळी झाली. तोच पुढे पीएच.डी.चा विषय झाला आणि एका अनोख्या विषयावर ही पदवी त्याने मिळवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -