घरमहाराष्ट्रआम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर..., आंबेडकरांकडून दोन्ही काँग्रेस...

आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर…, आंबेडकरांकडून दोन्ही काँग्रेस लक्ष्य

Subscribe

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीत समाविष्ट न करण्यात आलेल्या पक्षांमध्ये महाराष्ट्रातील प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही समावेश आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध विरोधकांची इंडिया (INDIA) आघाडी अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, विरोधकांनी तेलंगणमधील भारत राष्ट्र समिती (BRS), हैदराबादमधील एमआयएम (AIMIM) या दोन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार हात लांबच ठेवले आहे.

हेही वाचा – “राजकीय हस्तक्षेपामुळे आरक्षणाचे गांभीर्य संपत चालले”, राधाकृष्ण विखे पाटलांची खंत

- Advertisement -

तथापि, मुंबईतील बैठकीआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी प्रकाश आंबेडकर यांनी सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील व्हावे, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. परंतु ते ‘इंडिया’सोबत आल्यास आमच्या आघाडीला फायदाच होणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. पण नंतर, आपल्याला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, जातीयवादी शक्ती घालवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आंबेडकर यांना केले. पण त्याचबरोबर, इंडिया आघाडीच्या बैठकीला बोलाविण्यासाठी ती काही सत्यनारायणाची पूजा नव्हती, असेही त्यांनी सुनावले आहे. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवले जाते, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

हेही वाचा – अजित पवारांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ? जयंत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत. इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? असा सवाल करतानाच, लालूप्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधील मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का, याबद्दल मला शंकाच आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -