पश्चिम बंगाल, ओडिशात वादळ; महाराष्ट्रात मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः पश्चिम बंगाल आणि ओडिशात मोचा वादळ धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीला या वादळाचा धोका आहे. तर केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या खाडीत चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी ८ मेरोजी तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होईल, अशी दाट शक्यता आहे. हे वादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकणार असले तरी त्याचा परिणाम अन्य राज्यांवरही होणार आहे. वादळ मंगळवार किंवा बुधवारी उत्तरेच्या दिशेने मध्य बंगालच्या खाडीकडे मार्गक्रमण करेल. ९ मेपर्यंत खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हे वादळ येणार आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.

वादळामुळे ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मच्छिमारांना या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत दक्षिण-पूर्व दिशेला जे मच्छिमार आहेत त्यांनी ७ मेच्या आधी आणि मध्य खाडीत असलेल्या मच्छिमारांनी ९ मेच्या आधी समुद्रातून सुरक्षित जागी यावे. मच्छीमारांनी पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहावे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

मोचा वादळाचा इशारा मिळताच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. चक्रीवादळावर बारकाईने लक्ष ठेवण्यास आणि याची सतत माहिती घेण्यास मुख्यमंत्री पटनायक यांनी मुख्य सचिवांना सांगितले आहे. सोबतच अन्य संबंधित विभागांना सर्तक राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री पटनायक यांनी जारी केले आहेत.

या वादळामुळे  मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानातही बदल होईल़. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा फटका बसणार आहे.