घरमहाराष्ट्र4 तारखेपासून ऐकणार नाही!

4 तारखेपासून ऐकणार नाही!

Subscribe

मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत, भोंग्यांवरून राज यांचा ठाकरे सरकारला शेवटचा इशारा

मी पुन्हा एकदा सांगतोय की मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नाही, तर सामाजिक विषय आहे. मला एका पत्रकाराने विचारले की अचानक भोंगे? पण भोंगे हा विषय नवीन नाही. याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छादेखील नाही. मुस्लीम

समाजानेदेखील ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. 3 तारखेला ईदचा सण असल्याने मला कुणाच्याही आनंदावर विरजण घालायचे नाही, परंतु 4 तारखेपासून जर मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर आम्ही अजिबात ऐकणार नाही. भोंगे लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर आम्हीही मशिदींबाहेर मोठ्याने दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार. हा विषय धार्मिक करणार असाल, तर आम्ही त्याला धार्मिक पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला. महाराष्ट्रदिनी रविवारी औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडलेल्या सभेत ते बोलत होते.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिलेे. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रातील नेते रोज बरळत आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाला समाजवाद, हिंदुत्व, कम्युनिझम हे सगळे विचार दिले, सर्वांत जास्त समाजसुधारक दिले, त्या महाराष्ट्राची काय स्थिती झाली आहे? आई-बहिणीवर शिव्या दिल्या जात आहेत. कोणीच मुद्यावर बोलत नाही, गुद्यावरच बोलले जात आहे आणि मला तुम्ही महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असे विचारले जात आहे.

राज ठाकरेचे भाषण आहे, हल्लागुल्ला करा आणि या असे सुरू आहे. या राजकारण्यांना हेच हवे आहे. माझी दोन भाषणे काय झाली, सगळे फडफडायला लागलेत. मग भोंग्यांचा विषय कधी काढायचा नाही का? उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का नाही? भोंगे फक्त संभाजीनगरमध्येच नाही, तर देशभरात आहेत. संपूर्ण देशातील लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत. प्रत्येक वेळी आम्हीच का भोगायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

शरद पवार पुन्हा लक्ष्य
राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करीत आहेत. शरद पवार नास्तिक आहेत, असे मी म्हटलो तर ते त्यांना लागले. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात की, राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तके वाचली पाहिजेत. मी सर्व वाचलंय. माझे आजोबा धार्मिक होते. ते हिंदू धर्माच्या नव्हे, तर भटभिक्षुकांच्या विरोधात होते. सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांच्या ‘उठ मराठ्या उठ’ या पुस्तकात हिंदू धर्मियांवरील अत्याचाराची माहिती आहे. शरद पवार यांनी ते जरूर वाचावे. मुळात शरद पवारांना हिंदू या शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. त्यांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही. माझ्या बोलण्यानंतर ते आता सगळीकडे नाव घ्यायला लागले. मंदिरातील फोटो छापून यायला लागले. महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांचा आहेच; पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, असेही राज म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -