मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्रातही होणार राजकीय भूकंप?

मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर तशाच प्रकारचा महाराष्ट्रातही राजकीय भूकंप येणार का? अशी चर्चा रायकीय वर्तुळात सुरू आहे.

mahashivaghadi-1
मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही येणार राजकीय भूकंप?

मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मोठा राजकीय भूकंप आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झपाट्याने पसरत आहे. तसेच आता मध्यप्रदेशामधील पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात उमटणार असल्याचे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. तसेच, ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक २२ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्रातही असा प्रकारचा राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तृळात सुरू आहे.

युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यांनी मध्यप्रदेशात केलेला राजकीय भूकंप महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड येथे ही होण्याची चिन्हे आहेत.,ज्योतिरादित्य यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे देशभरात काँग्रेसला घरघर लागेल, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. एका वृत्तवाहिनीनुसार रामदास आठवले म्हणाले की, ज्योतिरादित्य सिंधिया हे मुळचे महाराष्ट्राचे असून मराठी भाषिक आहेत. याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया यांची आजी देखील याआधी भाजप पक्षात होती. त्यामुळे ज्योतिरादित्य यांनी भाजपात प्रवेश करून घरवापसी केली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपावर टीका करण्यात येत आहे. मात्र, भाजपने कोणत्याच प्रकारची फोडाफोडी केली नसल्याचे आठवले यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत आल्यास राज्यात मजबूत सरकार अस्तित्वात येईल. तसेच असं काही न घडल्यास लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षात बंडखोरी होईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा मोठा खुलासा देखील रामदास आठवले यांनी यावेळी केला आहे.

भाजपचे मध्यप्रदेशात सुरू असलेलेले ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होताना दिसत असल्याने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते सतर्क झाले आहेत. या नेत्यांनी आपापल्या आमदारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले असून सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदारांशी सुसंवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना पक्षात आणून भाजपने कमलनाथ यांचे सरकार अडचणीत आणले आहे. मध्यप्रदेशातील मोहिम यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येऊ शकते, याबाबत भाजप नेते आशावादी आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आघाडी सरकारच्या राजकीय स्थैर्याविषयी विधाने करून सरकारविरोधात वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला निर्विवाद कौल दिला. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांचे बिनसले आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आकाराला आले. १०५ आमदार असतानाही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. या अस्वस्थेतूनच सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे डावपेच आहेत. सीएए, एनआरसी, मुस्लिम आरक्षण आदी मुद्यांवर सरकारला विशेषत: शिवसेनेला लक्ष्य करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. तर भाजपकडे अपक्ष मिळून ११४ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत १४५ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला ३१ आमदारांची गरज आहे. आघाडीतून ३० हून अधिक आमदारांनी गळाला लावणे अवघड आहे. तसेच पक्षांतर बंदी कायद्याचा मोठा अडसर आहे. अशावेळी आघाडीचे सरकार अंतर्गत मतभेदांनी अडचणीत आले, तर शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सोबत घेऊनच भाजपला सरकार बनविणे शक्य आहे.

‘भाजपचे नेते रोजच सरकार पाडण्याचे स्वप्न बघत आहेत. राज्यात तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्रात मध्यप्रदेशसारखी स्थिती उद्भवणार नाही. आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही’
– नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस.