घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राला विजेच्या बल्बची 'कावीळ'

महाराष्ट्राला विजेच्या बल्बची ‘कावीळ’

Subscribe

एलईडी बल्बच्या खरेदीत वाढ झालेली असली तरीही पिवळ्या बल्बला असणारी मागणी ही नजर अंदाज करता येणार नाही. निमशहरी तसेच ग्रामीण भारतात एलईडी बल्बच्या गुणवत्तेवर अजुनही शंका असल्याचे प्रयासच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

देशभरात एलईडी बल्बचा बोलबाला असला तरीही, ग्रामीण भारतात मात्र आजही पिवळ्या बल्ब (इनकॅन्डेसेन्ट बल्ब)च्या प्रकाशाचीच दारोमदार आहे. २०१७ मध्ये भारतातील एकूण विजेच्या दिव्यांच्या विक्रीत ५० टक्के वाटा हा पिवळ्या बल्बचा आहे. भारतात एकूण वीज वापरामध्ये घरगुती दिवेलागणीत १८ टक्के ते २७ टक्के वाटा हा नुसत्या संमिश्र स्वरूपाच्या विजेच्या दिव्यांचा आहे. मोठ्या प्रमाणावर वापर असलेले पिवळे बल्ब हे सीएफएलच्या तुलनेत चार पटीने वीज खर्ची करतात, तर एलईडीच्या तुलनेत पिवळ्या बल्बला सात पटीने वीज लागते. प्रयास ऊर्जा गटाने केलेल्या अभ्यासात पिवळ्या बल्बला हद्दपार करण्यासाठी एक्शन प्लॅन तयार करतानाच एलईडी बल्बबाबत जनसामान्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. प्रयासचे रिसर्च फेलो आदित्य चुनेकर, संजना मुळे, मृदुला केळकर यांनी हा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.

कुणाची किती विक्री

२०१७ सालामध्ये पिवळ्या बल्बचा विक्रीचा वाटा ५१ टक्के होता. त्यापाठोपाठ एलईडी बल्ब २२ टक्के, ट्युब लाईट १२ टक्के, सीएफएल ९ टक्के तर एलईडी ट्युबलाईटचा वाटा हा ६ टक्के इतका होता. इंडियन लॅम्प एण्ड कम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार २०१७ सालामध्ये एकुण विजेवर आधारीत प्रकाश देणाऱ्या उपकरणांची विक्री १५०८ दशलक्ष इतकी होती. त्यापैकी पिवळ्या बल्बची विक्री ७७ कोटी इतकी आहे.

- Advertisement -

पिवळ्या बल्बच कारण गरीबीच

२०११ ते २०१८  या कालावधीत ६ कोटी ७० लाख घरांमध्ये विजेची जोडणी देण्यात आली. पण ग्रामीण भारतातील गरीबी हेच मुख्य कारण पिवळ्या बल्बच्या खरेदीमागे आहे. देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अशी पिवळ्या बल्बची विक्री झाली आहे. देशभरातील पिवळ्या बल्बच्या विक्रीत महाराष्ट्राचा वाटा हा सर्वाधिक असा आहे. महाराष्ट्रात १२ टक्के पिवळ्या बल्बची विक्री झाली आहे. तर त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली अशा राज्यांचा वाटा आहे. ईईएसएलच्या २०१४ सालच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील अनेक भागात आजही पिवळ्या बल्बचा मोठा वापर आहे.

काय आहे ‘प्रयास’च सर्वेक्षण

प्रयासने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणनुसार पुणे जिल्ह्यातील ४४५ घरांचा अभ्यास करण्यात आला होता. या सर्व घरांमध्ये पिवळ्या बल्बचा वापर करण्यात येत होता. किमान दोन तास पिवळ्या बल्बचा वापर असणारी घरे तसेच घरामधील एकुण विजेच्या प्रकाशाच्या दिव्यांमध्ये पिवळ्या बल्बचा वापर असणारी घरे या निकषावर आधारीत सर्वेक्षण करण्यात आले होते. ३८ गावांमध्ये हे सर्वेक्षण प्रयासमार्फत करण्यात आले. लघु, मध्यम आणि उच्च असा आर्थिक स्थर असणाऱ्या तीन श्रेणीतील घरांची निवड यासाठी करण्यात आली होती. लघु आणि मध्यम आर्थिक स्थरातील एलईडी बल्बच्या किमतीमुळे या बल्बच्या खरेदीचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले होते. तर ५७ टक्के लोकांना एलईडी बल्बबाबत आणि त्याच्या फायद्याबाबत माहिती नसल्याची माहिती स्पष्ट उघड झाली. तर ३ टक्के लोकांनाच केंद्र सरकारच्या उजाला योजनेबाबत माहिती आहे. ३८ टक्के घरांमध्ये किमान एक एलईडी बल्ब असल्याचे आढळले आहे. तर ८४ टक्के लोकांची एलईडी बल्बच्या खरेदीची तयारी आहे. एलईडी बल्बची सरासरी किंमत १४६  रूपये तर १५० रूपये इतके आहे. काही टप्प्यांमध्ये ही रक्कम भरण्यासाठी घरगुती ग्राहकांची तयारी आहे. तर पिवळे बल्ब हे अवघ्या १० रूपये ते १५ रूपयांमध्ये उपलब्ध आहेत. २०१७ मध्ये पिवळ्या बल्बची उलाढाल २ हजार ९२७ कोटी होती. तर भारतातील एलईडी बल्बची उलाढाल ही १४ हजार २७७ कोटी इतकी आहे.

- Advertisement -

पिवळ्या बल्ब हद्दपार करणे अशक्य

जगभरातील अनेक देशांनी पिवळ्या बल्बच्या उत्पादनावर बंदी आणली आहे. त्यामध्ये चीन, अमेरिका, ब्राझील, युरोपियन युनियनने पिवळ्या बल्बवर बंदी आणली आहे. पण भारतात मात्र पिवळे बल्ब हद्दपार करण अशक्य आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या घरांमधून हे हद्दपार करण्याच सर्वात मोठ आव्हान आहे. दुसरीकडे भारतातील विजेच्या पुरवठ्याची सुमार यंत्रणा हेदेखील एक महत्वाच कारण आहे.

धोरणकर्त्यांची भूमिका महत्वाची

एलईडी बल्बच्या खरेदीत वाढ झालेली असली तरीही पिवळ्या बल्बला असणारी मागणी ही नजर अंदाज करता येणार नाही. निमशहरी तसेच ग्रामीण भारतात एलईडी बल्बच्या गुणवत्तेवर अजुनही शंका असल्याचे प्रयासच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. धोरणकर्त्यांनी एलईडी बल्बची किंमत कमी होईल यासाठीचा प्रयत्न करतानाच पिवळ्या बल्बच्या निर्मात्यांना नियंत्रित करणेही तितकेच महत्वाचे असल्याचे प्रयासचे मत आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीच्या माध्यमातून देशभरात जागरूकतेसाठी कॅम्पेन करता येईल असे प्रयासने सुचवले आहे. एलईडीच्या गुणवत्तेबाबत हा कार्यक्रम असायला हवा. एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हीसेस लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तसेच सौभाग्य योजनेअंतर्गत ग्रामीण भारतातील गरीब घरगुती ग्राहकांना एलईडी बल्बचा वापर आणि महत्व पटवून देणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -