घरCORONA UPDATEनियमित योग-प्राणायाम कोरोना संसर्गातही लाभदायी

नियमित योग-प्राणायाम कोरोना संसर्गातही लाभदायी

Subscribe

जगण्यासाठी श्वास देणाऱ्या फुफ्फुसांची मूळ क्षमता ५ लिटर एवढी असली तरीही, प्रत्यक्षात आपण केवळ अर्धा लिटर एवढाच वापर करत असतो. कोरोना संसर्गामुळे फुफ्फुस आणि प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे. अशा या प्राणवायूचे महात्म्य सांगणाऱ्या योग आणि प्राणायामचे महत्त्व आता सर्वांनाच महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे आजच्या या भागात कोरोनाबाधितांनी योगासन व श्वसनाचे कोणते प्रकार करावेत, काय काळजी घ्यावी, काय टाळावे यासंदर्भात माहिती घेणार आहोत.

पृथ्वी, आकाश, अग्नी, जल, वायू या पंचमहाभूतांपासून तयार झालेल्या शरीराचे कार्य कोणत्याही एका तत्वाचा प्रभाव कमी किंवा अधिक झाला की बिघडते. कोरोना संसर्गात या विषाणूंचा थेट परिणाम हा श्वसनप्रक्रियेवर होतो. ही प्रक्रिया संपूर्ण फुफ्फुसाद्वारे पूर्ण होत असते. म्हणून फुफ्फुसात किती प्रमाणात संसर्ग झाला आहे त्यावर ऑक्सिजनची पातळी ठरत असते. फुफ्फुस जेवढे चांगले तितकी रक्तातील ऑक्सिजनची पातळी (ऑक्सिजन सॅच्युरेशन) चांगली. म्हणूनच दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी, तसेच भुजंगासन, शवासन, योगनिद्रासारखे योगप्रकार करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

शरीरात ऑक्सिजनची पातळी जेवढी चांगली (निर्धारित प्रमाणात) तितके पेशी आणि अवयवांचे कार्य उत्कृष्ट सुरू राहते. पर्यायाने प्रतिकारशक्तीही वाढते. नेमका हाच हेतू योग-प्राणायामांमध्ये साध्य होतो. यात शरीराच्या अंतर्बाह्य प्रत्येक अवयवाचा सारासार विचार केलेला दिसतो. लयबद्ध श्वसन आणि त्यानुसार योगासने केल्यास मानसिक शांतता, लवचिक शरीर, उत्साह, आनंदानुभूती प्राप्त होते.

- Advertisement -

फुफ्फुसांचा वापर अवघा १२ टक्के

मानवी शरीरात असलेल्या फुफ्फुसांची एकूण वायूधारण क्षमता ही सुमारे ५ लिटर एवढी असते. प्रत्यक्षात सामान्यपणे अवघी टक्के क्षमता असली तरीही केवळ १२ टक्के क्षमतेचाच वापर आपण करत असतो. म्हणूनच फुफ्फुसांमध्ये थोडाही संसर्ग निर्माण झाला की, त्याचा थेट परिणाम हा ऑक्सिजनच्या पातळीवर होत असतो. योग आणि प्राणायाम करताना फुफ्फुसांची क्षमता ५ ते १० पट वाढते. पर्यायाने फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

हे योग-प्राणायाम ठरतील उपयुक्त

शास्त्रशुद्ध माहिती घेऊन केलेले योग-प्राणायाम अधिक फलदायी ठरतात. ज्यांना माहिती नाही त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने भस्त्रिका, अनुलोम-विलोम, भ्रामरी, उद्गीथ आणि ओंकार करण्यास हरकत नसते. केवळ अनुलोम विलोम आणि दीर्घ श्वसन केले तरीदेखील चांगला लाभ दिसून येतो. योगासनांमध्ये सौम्य आणि मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांना कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार करण्यास हरकत नाही. यानिमित्ताने ऊन्हातून विटॅमिन डी मिळेल आणि व्यायामही होईल. कोरोनाच्या औषधांमुळे अशक्तपणा आलेला असेल तर मात्र घरातच पोटावर झोपण्याची काही आसने सांगितली जातात. फुफ्फुसांचा बहुतांश भाग हा पाठीच्या दिशेकडे असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना या आसनांचा लाभ होताना दिसतो. घरी असलेल्या रुग्णांना सूक्ष्म व्यायामाने सुरुवात केल्यानंतर मकरासन, अर्ध भुजंगासन, बालासन, शवासन या क्रमाने आसन केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. आसन करताना मन शांत, जागा स्वच्छ व मोकळी असावी. लयबद्ध श्वास, लक्षपूर्वक एक-एक आसन करणे अपेक्षित असते. हे करताना मनात १ ते १० अंक मोजू शकता. प्राणायामात याचा विशेष उपयोग होतो. श्वास घेताना १ ते १० आणि सोडताना १० ते १ या क्रमाने अंक मोजल्यास लक्ष विचलित होत नाही.

ही घ्या काळजी

  • योग-प्राणायाम करताना यथाशक्ती अर्थात आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार करा.
  • आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या
  • कोणताही त्रास जाणवल्यास विश्रांती घ्या
  • शक्यतो सकाळी लवकर योग-प्राणायाम करा
  • मास्क लावून कोणताही व्यायाम करू नका
  • जागरण व अवेळी आहार टाळा

योग करायला लागले की आपोआपच शरीरांतर्गत प्रत्येक अवयवांचे कार्य, त्यांची क्षमता सुधारण्यास मदत होते. ही आसने रुग्णांना लाभदायी ठरतातच, शिवाय निरोगी व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढवून त्यांना आरोग्यदायी ठेवतात. योगप्रकारांनी रक्तसंचार सुरळीत होऊन विषांत पदार्थ (टॉक्सिन्स) निघून जातात. निरोगी राहण्यासाठी जागरण टाळा, पहाटे लवकर उठा. बाहेरचे पदार्थ टाळा.
– डॉ. प्रेमचंद जैन, संचालक, योग विज्ञान प्रबोधिनी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -