घरमहाराष्ट्रसुधागडात २२ हजार तरुण बेरोजगार!

सुधागडात २२ हजार तरुण बेरोजगार!

Subscribe

नेत्यांच्या विरोधात आक्रोश

आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या सुधागड तालुक्यात १०८ गावांतील २२ हजार ५६४ तरुण रोजगारापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी अनेेकांना पदवीच्या तुलनेत हलकी कामे करावी लागत आहेत. उद्योग आणण्याच्या घोषणा करणार्‍या राजकारण्यांच्या विरोधात ते तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत आहेत.

गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण्यांनी मतांचा जोगवा मागताना कारखाने आणण्याची आश्वासने दिली खरी मात्र त्याची योग्य पूर्तता न झाल्यामुळे मोजकेच कारखाने तालुक्याच्या ठराविक भागात सुरू झाले. राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडत अनेक तरुण कर्जबाजारी होऊन पदवीधर झाले आणि हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा बाळगून राहिले. प्रत्यक्षात आलेल्या कारख्यान्यांतून रोजगार दूरच, त्यांना प्रवेशद्वारावरही उभे करण्यात येत नाही. त्यामुळे मिळेल ते काम करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. आजमितीला अनेक पदवीधर तरुण घरी बसून आहेत, तर काहींनी नाइलाजास्तव हॉटेल, छोट्या-मोठ्या दुकानांतून नोकरी पत्करली आहे. आज हे तरुण आश्वासन देणार्‍या शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या नावाने खडे फोडत आहेत.

- Advertisement -

काही ठिकाणी नोकरीसाठी मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याने हे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न सर्वसामान्य पालकांसमोर उभा आहे. काहींनी चक्क मोठ्या रकमांची कर्जे काढून मुलांना नोकरीत चिकटविल्याचे वास्तव आहे. नव्या सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी किंवा व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून निवडणुकीच्या वेळी घेतल्या जाणार्‍या सभांमध्ये तालुक्याचा विकास करू, तसेच तरुणांना रोजगार देऊ, अशा घोषणा राजकारण्यांनी केल्या. मात्र त्याची पूर्तता केली नाही.
-प्रकाश पालकर, कार्याध्यक्ष, सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था

- Advertisement -

नोकरीसाठी प्रमाणपत्रांची भेंडोळी घेऊन वणवण फिरत आहे. एका ठिकाणी चक्क 50 हजार भरावे लागतील, मग कामावर घेऊ असे उत्तर मिळाले. ते भरु शकत नसल्याने घरी बसून आहे.
-योगेश शिंदे, नांदगाव

पदवी मिळवून 5 वर्षे झाली. रायगडसह पुणे, मुंबई, नवी मुंबईत नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण ते व्यर्थ ठरले. शेवटी आता एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत आहे.
-गजानन मोरे, तरुण तोरंकेवाडी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -