घरमुंबई65 लाखांचा गहू जप्त

65 लाखांचा गहू जप्त

Subscribe

शिधावाटप व्यवस्थेच्या गव्हाचा साठा जप्त

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकेवर वितरित होणार्‍या धान्याचा काळाबाजार करणार्‍या मिलवर शिधावाटप कार्यालय परिमंडळाने धाड टाकली. या धाडीमध्ये कंटेनरसह सुमारे 2,37,600 किलो गहू जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत सुमारे 65,34,120 इतकी आहे. संबंधित अधिकार्‍यांनी सदर कंटेनर व मिलची तपासणी केली असता, तेथे उत्तर प्रदेश सरकार, हरियाणा सरकार, पंजाब सरकार अशा वेगवेगळ्या राज्यांच्या भारतीय खाद्य निगमच्या निळा पट्टा असलेल्या हाताने शिवलेल्या व ज्यूट बारदानमधील गव्हाच्या गोण्या आढळून आल्या. मिल मालक सदर गहू भारतीय खाद्य निगमकडून खरेदी केल्याचे अधिकृतरित्या सिद्ध करू शकलेला नाही.

ठाण्यातील फ परिमंडळाच्या हद्दीतह येणार्‍या ठाणे-बेलापूर रोडवरील मे.कौशल्या रोलर फ्लोअर मिल्समध्ये शिधावाटप व्यवस्थेतील गहू येणार असल्याची खबर ग्राहक संरक्षण समितीच्या अशासकीय कार्यकर्त्यांनी दुरध्वनीद्वारे शिधावाटप कार्यालयास कळवली. मुंबईचे शिधावाटप नियंत्रक आणि नागरिपुरवठा संचालक दिलीप शिंदे, फ-परिमंडळाचे नियंत्रक नरेश वंजारी आणि शिधावाटप अधिकारी राजू पळसकर यांच्या पथकाने तत्काळ सदर ठिकाणी धाड टाकून आरोपीस मुद्देमालासह पकडले. याविरोधात मिल्स मशीन ऑपरेटर सुमनकुमार स्वामी, मिल्सचे डायरेक्टर महेश गुप्ता, संचालक मंडळातील इतर पदाधिकारी तसेच कंटेनरचा ड्रायव्हर रामकिशोर श्रीवास्तव, कंटेनरचा मालक अ.के.भाटिया यांच्याविरोधात शिधावाटप अधिकारी राजु पळसकर यांनी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा1955 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकेवर वितरित होणारा गव्हाचा कंटेनर येणार असल्याची माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी भारतीय खाद्य निगमच्या निळा पट्टा असलेल्या ज्यूट बारदानमधील विविध राज्यांतील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंंर्गत शिधापत्रिकेवर वितरण करावयाचा गव्हाचा साठा होता. हा गहू रवा आटा, मैदा तयार करण्यासाठी अवाजवी नफा कमवण्याच्या उद्देशाने अवैध मार्गाने प्राप्त केल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले. या विरोधात रितसर तक्रार दाखल केली असून यापुढे सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेत काळाबाजार करणार्‍यांची गय केली जाणार नाही
– राजू पळसकर, शिधावाटप अधिकारी, फ-परिमंडळ, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -