घरनवरात्रौत्सव 2022एचआयव्ही पॉझिटीव्ह हीच माझी सकारात्मकता

एचआयव्ही पॉझिटीव्ह हीच माझी सकारात्मकता

Subscribe

गेली १८ वर्षे एचआयव्ही पॉझिटीव्ह असूनही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघत आपल्या आयुष्याला नवं वळण देणार्‍या मीना मरसकोल्हे. आपल्याला एचआयव्ही आहे हे कळताच आपल्या सारख्याच व्यक्तींसाठी काम करणार्‍या मीना आज मानाने जगत आहेत. हट्टाने लग्न केल्यामुळे त्यातून तिला तिच्या नवर्‍याकडून एचआयव्हीचं संक्रमण झालं असल्याचं कळताच माहेरचे दरवाजे मीनासाठी ‘त्या’ कठीण काळात बंद झाले. पण, त्यातूनही न थांबता, न डगमगता त्यांनी त्यांचं जगणं सुरूच ठेवलं.

मैने हर दम खुशी में डाला है, मेरा हर चलन निराला है!

लोग जिन हादसों से डरते है, उन्ही हादसोंने मुझे पाला हेै!

- Advertisement -

समाजाचा आजही एचआयव्ही झालेल्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही आणि याच समाजातील आपण एक घटक आहोत, या विचाराने आपल्यासारख्या लाखो एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींना त्यांना त्यांचं आयुष्य सुखकर बनवता येऊ शकतं, यासाठी मीना मरसकोल्हे या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीतील एआरटी सेंटरमध्ये मीना सल्लागार म्हणून काम करतात. कामाबद्दलची त्यांची एकनिष्ठा पाहून सहकारीही त्यांचं मनभरुन कौतुक करतात. एआरटी सेंटरमध्ये नव्याने दाखल होणार्‍या एचआयव्हीग्रस्त लोकांचं समुपदेशन करणं, एचआयव्ही म्हणजे जगण्याचा शेवट नाही असं सांगत त्यांना जगण्यासाठी धीर देणं, समाजात आपणही मानाने जगलं पाहिजे हे समजावून सांगणं आणि नंतर त्यांना एआरटी उपचारांवर तात्काळ आणणं या आणि अशा अनेक भूमिका मीना बजावत आहेत.

२००१ ते २०१८ पर्यंतचा मीनाचा प्रवास –

२००१ सालच्या एप्रिल महिन्यात मीना यांच्या पतीला एचआयव्ही असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांची तब्येत ढासळत होती. लोक एचआयव्ही हा शब्द उच्चारायला ही घाबरत होते. अशा परिस्थितीत चाचण्या करायला, चौकशी करायला डॉक्टर्स, स्टाफही धजावत नव्हते. उपचार काय करायचे? कुठे करायचे? त्यात उपचारांसाठी न परवडणारा खर्च असे बरेच प्रश्न त्यांच्यासमोर होते. त्यात पदरी तीन मुलं. फक्त हा आजार नवीन आहे एवढंच कळत होतं. मीना यांनी त्यांच्या पतीला एक-दोन वेळा खासगी रुग्णालयातही दाखवलं. पण, तिथल्या स्टाफने त्यांचा रिपोर्ट त्यांच्या तोंडावर फेकला आणि त्यांना रुग्णालयातून जायला सांगितलं. पण, जाता जाता त्या स्टाफने मीना यांना सल्ला दिला होता की, ‘तुम्ही देखील एचआयव्हीची टेस्ट करुन घ्या.’ मीना यांनी एचआयव्ही टेस्ट केल्यानंतर कळलं की, त्याही पॉझिटिव्ह आहेत. त्यावेळेस मीना यांची तिन्ही मुलं लहान होती. मीना यांनी आपल्या तिन्ही मुलांची एचआयव्ही टेस्ट करुन घेतली. त्यापैकी एक मुलगी एचआयव्ही संक्रमित आहे.

- Advertisement -

२००२ साली मीना यांच्या पतीने त्यांची कायमची साथ सोडली. आता माहेरी जाऊन राहायचं म्हटलं तर आधीच दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे, मुलांना घेऊन राहायचं कुठे, जायचं कुठे? ही समस्या होतीच. मनावर झालेल्या आघातांमुळे सतत मानसिक खच्चीकरण होत होतं. पण, या परिस्थितीत खंबीरपणे उभं राहून आपल्या तिन्ही मुलांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने मीना यांच्या मोठ्या मुलाला आणि मुलीला एचआयव्हीचं संक्रमण झालं नव्हतं. त्यामुळे मोठ्या मुलाला माहेरी आणि दोन्ही मुलींना आश्रमात ठेवलं. आणि त्या स्वत: नवी मुंबई इथल्या टर्मिनल केअर सेंटरमध्ये राहायला गेल्या. टर्मिनल केअर सेंटरमध्ये एचआयव्हीने ग्रस्त असणारे, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जगणारे रुग्ण राहतात. पण, मीना सुदृढ होत्या. त्यामुळे त्यांनी इथल्या रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. तिथे सर्व्हंट म्हणून काम केलं. तिथल्या रुग्णांना जगण्याचा मंत्र दिला.

मृत झालेल्या एचआयव्ही रुग्णांचे सर्व सोपस्कार पार पाडण्याचंही काम केलं असल्याचं मीना अगदी ठासून सांगतात. ज्या रुग्णांचं कोणीच नाही, त्यांचे आम्ही आहोत या उद्देशाने मीना गेली १८ वर्षे काम करत आहेत. एक वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी जे.जे च्या एआरटी सेंटरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिथे येणार्‍या लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. पुढच्या पिढीला एचआयव्हीपासून वाचवता आलं पाहिजे म्हणून गरोदर महिलांना वेळच्यावेळी उपचार आणि गोळ्या घेण्याचा सल्ला त्या आजही देतात. जे.जे मध्ये एचआयव्हीबाबत सल्ल्यासाठी आलेल्या अ‍ॅन्थॉनी डिसोझा यांनी मीना यांना लग्नाची मागणी घातली. खूप वर्ष विचार केल्यानंतर सप्टेंबर २००५ साली मीना आणि डिसोझा यांचं लग्न झालं. आता तिन्ही मुलं आणि पती यांच्यामुळे मीना यांचं कुटुंब पूर्ण झालं आहे. शिक्षण पूर्ण न केल्याची खंत कायम मीना यांच्या मनात होती. त्यामुळे गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ साली मीना आणि त्यांच्या पतीने १३ वीची परीक्षा दिली आणि त्यात पासही झाले.

सध्या मीना मुंबई एड्स जिल्हा नियंत्रण सोसायटीमध्ये एचआयव्ही ग्रस्त लोकांना सल्ला देण्याचं काम अगदी निष्ठेने करत आहेत. शिवाय, त्या ज्यांना आधाराची गरज आहे, माहितीची गरज आहे अशांना आम्ही तुमच्यासाठीच आहोत हे अगदी विश्वासाने समजावून सांगतात. रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांचं समुपदेशन, रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेणं, बाळाला एचआयव्ही होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायला पाहिजे हे सांगणं, १५ ते ४९ या वयोगटातील लोकांना युवा एचआयव्ही काय आहे? याबाबत माहिती देणं, कॉलेजेसमध्ये जाऊन जागृती करणं, एड्स असलेल्यांनी औषधं वेळेवर खाणं किती गरजेचं आहे हे समजावणं, अशी अनेक कामं मीना करतात.

एखाद्या व्यक्तीला तो एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे हे समजलं की, त्याचे संक्रमण वाढू नये म्हणून तात्काळ एआरटी उपचारांवर घेतलं जातं. त्यासाठी आधी योग्य चौकशी करणं गरजेचं असतं. त्यांना या आजाराबद्दल माहिती देणं महत्त्वाचं असतं. या आजारामध्ये आयुष्यभर वेळ न चुकवता जेवण आणि गोळ्या घेणं आवश्यक असतं. ज्यामुळे एड्सचा विषाणू शरीरात पसरत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. पांढर्‍या पेशी वाढतात. त्यामुळे जे संधीसाधू आजार असतात ते जडत नाहीत. या सर्वातून एका एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचं जगणं सकारात्मक होऊ शकतं, असंही सांगतात. त्यामुळे, एआरटी सल्लागार म्हणून काम करणार्‍या एचआयव्ही पॉझिटीव्ह मीना पुरुषोत्तम मरसकोल्हे यांच्या या सकारात्मक आयुष्य जगण्याच्या जिद्दीला सलाम…

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -