घरमुंबईअकरावीच्या 76 हजार जागा रिक्त

अकरावीच्या 76 हजार जागा रिक्त

Subscribe

मुंबई:ऑक्टोबर सुरू झाला तरी अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच आहे. एटीकेटी आणि फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित असून उपसंचालक कार्यालयाच्या फेर्‍या मारत आहेत. या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी सोमवारपासून सुरू केलेल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार मुंबई विभागात तब्बल 76 हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे 76 हजार मुलांना प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवेश नियंत्रण समितीकडून पार पडलेल्या तीन फेर्‍यांनंतरही शेकडो पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. तसेच अनेक पालकांनी प्रवेशासाठी आणखी एक संधी देण्यासंदर्भात लिखित अर्जही केले.

त्यामुळे सोमवारपासून प्रवेशाची चौथी फेरी सुरू करण्यात आली. या चौथ्या फेरीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मुंबई विभागामध्ये तब्बल 76 हजार जागा रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. या रिक्त जागांमध्ये सर्वसामान्यांसाठी तब्बल 60 हजार 762, मॅनेजमेंट कोट्यातील तीन हजार 414, इनहाऊस कोट्यातील चार हजार 711 तर अल्पसंख्याकांसाठी सात हजार 188 जागा रिक्त आहेत.

- Advertisement -

चौथ्या फेरीमध्ये ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामध्ये आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, आतापर्यंत कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय न मिळालेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, प्रवेश नाकारलेले विद्यार्थी, एटीकेटी सवलतधारक विद्यार्थी व नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांना हमखास प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु हे प्रवेश त्यांच्या पसंतीनुसार मिळणार नसून, प्रवेशाच्या अर्जानुसार मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -