घरCORONA UPDATEकोरोना रुग्ण संख्या घटल्यामुळे ८ ‘जम्बो सेंटर’ बंद होणार

कोरोना रुग्ण संख्या घटल्यामुळे ८ ‘जम्बो सेंटर’ बंद होणार

Subscribe

पहिल्या टप्प्यात ३ केंद्रे यापूर्वीच बंद, दुस-या टप्प्यात उर्वरित ५ केंद्रे बंद करणार, मात्र सेव्हन हिल्स रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये ‘कोरोना’ उपचार सुरूच राहणार

मुंबईत मार्च २०२० पासून सुरू झालेल्या ‘कोरोना’चा प्रभाव सध्या कमी झाला आहे. त्यामुळे ‘कोरोना’ रुग्ण संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ‘कोरोना’वरील ३ ‘जम्बो सेंटर’ बंद यापूर्वीच बंद केले होते. आता उर्वरित ५ ‘जम्बो सेंटर’ बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अशा प्रकारे पालिकेने सुरू केलेली एकूण ८ ‘जम्बो सेंटर’ बंद झाल्यात जमा आहेत. मात्र मुंबईत अद्यापही ‘कोरोना’चे रुग्ण काही प्रमाणात आढळून येत असल्याने त्यांच्यावर पालिकेच्या सेव्हन हिल्स व इतर रूग्णालयात उपचार करण्याची सुविधा सुरूच ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत मार्च २०२० पासून ‘कोरोना’ चा संसर्ग सुरू झाला. प्रारंभी काही दिवसांतच ‘कोरोना’ च्या रुग्ण संख्येत वाढ होत गेली. त्यामुळे मुंबई महापालिकेची रुग्णालये व तेथील खाटा कमी पडू लागल्या होत्या. त्यामुळे पालिकेने बीकेसी, दहिसर, मुलुंड, भायखळा आदी ८ ठिकाणी ‘जम्बो सेंटर’ सुरू केले.

- Advertisement -

सदर ८ ‘जम्बो कोरोना सेंटर’मध्ये १२ हजार ३७५ रुग्‍णशय्या व ९०७ अतिदक्षता रुग्‍णशय्या होत्या. या उपचार केंद्रांच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले. यामुळे हजारो रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले. त्यानंतर पालिकेमार्फत नागरिकांचे प्रभावीपणे लसीकरण करण्यात आले. परिणामी, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘कोरोना’ बाधित रुग्णांसह लक्षणे असणा-या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये ‘कोरोना’ रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने ‘कोरोना जम्बो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करण्याचे निश्चित केले.

‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को – गोरेगांव आणि कांजूरमार्ग येथील ‘जम्बो कोरोना केअर सेंटर’ यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर आता दुस-या टप्प्यात वांद्रे – कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोरोना केअर केंद्रे’ बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, या ठिकाणी कार्यरत असणारी लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत. ज्यामुळे, लसीकरणाबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही.

- Advertisement -

तसेच,‘कोरोना’ बाधा झाल्यास संबंधित रुग्णांना वेळच्यावेळी योग्य उपचार मिळावेत, या हेतूने पालिकेने सेव्हन हिल्स रुग्णालयासह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ‘कोरोना’ उपचार सुविधा कार्यरत असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. यानुसार महापालिका क्षेत्रातील सदर तिन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण ११ हजार १६५ रुग्णशय्यांची उपलब्धता असून आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल. तसेच सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले आहे.


सशस्त्र दलात डिसेंबर 2023 पर्यंत 84,405 रिक्त पदांची भरती; मोदी सरकारची माहिती


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -