घरमुंबईबाईपणाच्या पलिकडे..आईपणाच्या अलिकडे !

बाईपणाच्या पलिकडे..आईपणाच्या अलिकडे !

Subscribe

नाचणे मामाने आपल्या छोट्या भावाचा मुलगा दत्तक घेतला आणि राणीनीच्या जीवाची घालमेल सुरू झाली. आता तिला बाईपण फेकून देऊन आई व्हायचे होते... आणि अशातच राणीनीला दिवस गेले, अशी बातमी पसरली. झोपडपट्टीला आनंद झाला. राणेच्या बर्‍याच वर्षांनी घरात पाळणा हलणार म्हणून शेजारी पाजारी दिवस भरल्या राणे बाईला हे कर, ते करू नकोस असे सांगत होते. तिची काळजी घेत होते.

नाटककार जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकात मामी नावाचे एक पात्र आहे. सविता मालपेकर यांनी मामीची ही भूमिका अफलातून रंगवली आहे. मिलमधल्या मामाची बायको मामी आणि चाळीतल्या थोरामोठ्यांचीही मामी! तोंडाने फटकळ, पण मनाने चांगली बाई… शेजारधर्म पाळणारी, अडीअडचणींना धावून जाणारी, पण तिच्या उरी एक भळभळती जखम आहे. तिला मूलबाळ नाही आणि बाईला नवर्‍याकडून जे सुख लागते, ते सुद्धा कुठेतरी हरवल्यासारखे झालेले…. तसा मामाही सरळ, पण मिलच्या तीन पाळ्यांनी कातावलेला आणि मिलच्या संपाने जीवाला वैतागलेला! मामीची तळमळ त्याला दिसतेय; पण तो कुठेतरी कमी पडतोय… मामी ते सुख शोधण्यासाठी शेजारच्या मोहनचा हात धरते, त्याला काही हवं नको का पाहते. आपल्या टोपातली काळ्या वाटण्याची वाटीभर उसळ मोहनच्या आईच्या हातात देताना मामीची नजर मोहनवर… काही तरी मागणारी. जे मामा देऊ शकत नाही! गे मोहनच्या आये, उसळ आणलंय हा.. मोहन्याक दि, आवडता त्याका. मेलो बघना पन नाय… मामीचे हे आसुसलेपण एका बाईचे अतृप्तपण तर आहेच; पण आपण आई होत नसलेलं एक रितेपण घेऊनही ती फिरतेय… अशीच एक मामी, बाई आणि आईपणासाठी आसुसलेली माझ्या डोळ्यांसमोरून झरझर चाललीय…सत्यकथेतून! सायन चुनाभट्टीच्या चाळीत स्वदेशी मिलच्या मागच्या डोंगरावर आम्ही राहत असलेल्या झोपडपट्टीत आमच्या शेजारी राणे हवालदार राहत होते. पोलीसमध्ये नोकरीला असल्याने राणेचा भलताच रुबाब. बाकी आजूबाजूला आमच्यासकट सगळे मिल कामगार. परिस्थिती आणि मिलमधील शरीर जीर्ण करून टाकणार्‍या कामाने थकलेले. पण राणेचे तसे नव्हते. राणे दिसायलाही विनोद खन्नासारखा! त्याकाळी तो रेबॉनचा गॉगल लावून कामावर जायचा… त्याचे आम्हाला भारी कौतुक वाटायचे. राणेचे लव्ह मॅरेज होते. राणे हवालदाराची बायको राणे हवालदारीण! आजूबाजूच्या मालवणी माणसांनी तिला दिलेले हे नाव. मामाएवढी देखणी नाही, पण ती सुद्धा उंचपुरी, रेखीव. आमच्या शेजारचे सर्वात देखणे, सुखी कुटुंब. हेवा वाटावे असे… पण, काही वर्षांनी हे राणे कुटुंब वरून सुखी वाटतंय, पण आत ते मोडून पडलंय… हे आमच्या लक्षात आलं. त्यांना मूलबाळ तर नव्हतंच, पण अतृप्तपण जणू काही दोघांनाही खायला उठल्यासारखं त्यांचं जगणं होतं!

पोलिसाच्या नोकरीमुळे राणे हवालदाराला दिवस कधी जायचे ते कळत नव्हते. बारा,चौदा तास ड्युटी. नाईट शिफ्ट तर आणखी थकवणारी. त्यामुळे नोकरी आणि घर, यापलिकडे त्याचे जग नव्हते आणि मुळात दिसायला देखणा असला तरी तो माणूसघाणा होता. कोणाशी प्रेमाने दोन शब्द बोलायचा तर नाहीच; पण गरीब माणसांकडे बघण्याची त्याची नजर तुसडेपणाची होती. त्यात पोलीस असल्याचा माजही होताच. झोपडपट्टीत असतात, तशा बहुतेकांनी कोंबड्या पाळलेल्या. आमच्याकडेही त्या होत्या. एके दिवशी दिवेलागणीला सर्व कोंबड्या आल्या; पण आमचा रुबाबदार कोंबडा आला नाही. आमच्या आईची शोधाशोध सुरू झाली. चाळ फिरून झाली. कोंबडा मिळत नसल्याने डोके आऊट झालेल्या आईने मालवणी अस्त्र बाहेर काढले. आईचा आधीच आवाज मोठा, त्यात सर्व देव तिने खाली आणले… ‘माझो कोंबडो ज्या कोणी मेल्यानं धरल्यान आणि खावक बघता त्याचो सत्यानाश झाल्याशिवाय र्‍हवाचो नाय…’ आता पाच पानाचो विडो ठेवतंय आणि गाराणा घालतंय : कसो कोंबडो बाहेर काढतंय तो बघ… आईचे मालवणी अस्त्र लागू पडले. राणे हवालदाराने झाकून ठेवलेला आमचा कोंबडा दुसर्‍या दिवशी मिळाला. राणेचे दिवस जात असले तरी त्याच्या बायकोला दिवस आणि रात्रही खायला उठत असे… शेजारी पाजारी बसून छटाक गप्पा मारून कसाबसा वेळ जात होता; पण तिच्या तनामनाची घालमेल सर्वांना दिसत होती.

- Advertisement -

आमच्याच शेजारी नाचणे मामाचे कुटुंब होते. या मामालाही मूलबाळ नव्हते. हा एक दुवा असेलही, पण राणे आणि नाचणे कुटुंबाचे चांगले संबंध होते. वडे सागोती आणि बांगड्याच्या तिखल्याची वाटी एकमेकांच्या घरी जात होती. मुख्य म्हणजे राणीनीला दिवसभर बसण्याचे एक हक्काचे घर होते. राणेच्या घरात दोन माणसे, नाचणेकडे बरीच. त्याचे चार भाऊ. यापैकी दोन भावांवर राणीनीची नजर. संबंध जुळले होते आणि शेजारी पाजारी सर्वांना ते दिसत होते… राणीनीची ही रिते बाईपण शोधण्याची धडपड तिच्या देहबोलीतून दिसत होती. पण, शरीर सुख मिळत असले तरी ती आणखी काही तरी शोधत होती आणि ते आईपणाच्या मार्गावरून जाणारे होते… त्यातच आपले चंचल बाईपण तिला आत कुठेतरी खात असावे. म्हणून असेल पण नवर्‍याचा राणे हवालदाराचाही बाहेरख्यालीपणा तिला मान्य होता… उलट शरीरसुखासाठी आसुसलेल्या बाया पोरींना बाईच्या नजरेतून जोखून राणीन आपल्या घरात आणून नवर्‍याला त्या सोपवत असे… आणि वर दाराला कडी लावून पोलीस शिपायासारखी बाहेर बसलेली दिसायची.

नाचणे मामाने आपल्या छोट्या भावाचा मुलगा दत्तक घेतला आणि राणीनीच्या जीवाची घालमेल सुरू झाली. आता तिला बाईपण फेकून देऊन आई व्हायचे होते… आणि अशातच राणीनीला दिवस गेले, अशी बातमी पसरली. झोपडपट्टीला आनंद झाला. राणेच्या बर्‍याच वर्षांनी घरात पाळणा हलणार म्हणून शेजारी पाजारी दिवस भरल्या राणे बाईला हे कर, ते करू नकोस असे सांगत होते. तिची काळजी घेत होते. दिवस संपले, महिने गेले. गरोदरपणाच्या खुणा राणीनीच्या ओटीपोटी दिसत होत्या… आणि एके दिवशी बातमी आली : राणे हवालदाराला मुलगा झाला. राणीनीसकट आजूबाजूचे सर्व खूश झाले…बाळ घरी आणल्यानंतर राण्याचो झिल बघूक शेजारी पाजार्‍यांची एकच झुंबड उडाली…पण, बघून बाहेर येणार्‍याचे चेहरे काही वेगळे सांगत होते… त्यात बायांच्या तोंडावरच्या आनंदाने काहीशी संशयाची जागा घेतली होती… राणे विनोद खन्ना आणि राणीन मुमताज.. तर पोरगो तर दिसाक राजेश खन्ना नाय, तर रमेश देव तरी दिसाक व्हयो. काळो, मदराशासारखो ह्यो पोरगो दिसता, असा शेजारच्या साळगावकर काकीचा डायलॉग अजून इतक्या वर्षांनंतर माझ्या लक्षात आहे. साळगावकर काकीसारख्या झोपडपट्टीतील बायकांमधील शेरलॉक होम्स जागा झाला… ही भानगड नक्की काय, याचा शोध सुरू झाला आणि समोर आलेल्या खर्‍या बातमीने जो काही झोपडपट्टीला धक्का बसला त्यातून सावरायला नऊ महिने सोडा, एक वर्ष जावे लागले.

- Advertisement -

नाचणे मामांनी भावाचा दत्तक मुलगा घेतल्यापासून राणीनीच्या जीवाची घालमेल सुरू झाली होती… पण, तिला मूल दत्तक घेऊन पण ते लपवून त्याला आपणच जन्म दिल्याचा बनाव करून आपल्या नवर्‍याचा राणेचा खानदानी पुरुषपणा आजूबाजूच्या लोकांना दाखवून तर द्यायचा होताच; पण आपण बाई नाही, आईही होऊ शकते हे दाखवून आपली कूस रितेपणाची नाही, हा भाळी लागलेला शिक्का तिला पुसून काढायचा होता. यासाठी तिच्या डोक्यातून एक आयडिया निघाली… आधी ओकार्‍या काढून तिने राणे हवालदाराच्या घरात गोड बातमी असल्याचे पसरवले आणि नंतर पोटावर कपडे बांधायला सुरुवात केली. महिने उलटत होते तसे हे कपडे वाढत होते… पोट मोठे दिसण्यासाठी तर जास्तीचे तिने कपडे बांधले आणि मुमताजलाही जमणार नाही, असा भरल्या दिवसाच्या बाईचा अभिनय केला. आणि बरोबर नऊ महिने भरल्यावर ती शेजार्‍यांना कल्पना न देता हॉस्पिटलमध्ये गेली… आधीच प्लॅन ठरला होता. मूल कुठून तरी घेऊन ठेवले होते आणि आठवड्याने ते घरी आणले. राणे हवालदार आणि हवालदारीणीने आपल्या नसलेल्या मुलाचे कौतुक करत त्याला मोठा केले. अनेक वर्षे गेली. आपल्याला मूल होऊ शकते, असे चारचौघांत मिरवू पाहणारी राणीन आता त्या मुलाच्या मुलाला म्हणजे आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन फिरवत होती तेव्हा तिच्यातील बाई आणि आई या दोघीही तिच्या नातवासारख्या शांत निवांत होऊन गेल्यासारख्या दिसल्या…!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -