घरमुंबईआता तरी प्रशासन संवेदनशीलता दाखवेल का?

आता तरी प्रशासन संवेदनशीलता दाखवेल का?

Subscribe

मुंबईमध्ये रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडतात. बुधवारी ताडदेव पोलीस स्टेशनसमोर खड्ड्यांमुळे अपघात झाला. या अपघातामध्ये आदिती काडगे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर भाटीया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खड्ड्यात पडून दररोज कुणाचा तरी मृत्यू होतोय, तर कुणी तरी जखमी होतेय. वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. याच खड्ड्यांमुळे आतापर्यंत ५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

खड्ड्यामुळे झाला अपघात

ताडदेव पोलीस स्थानकाबाहेर बुधवारी खड्ड्यांमुळे अपघात झाला. स्कूटरवरुन जाणाऱ्या ३५ वर्षाच्या आदिती काडगे यांच्या गाडीला खड्ड्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये आदिती यांच्या डोक्याला जबर मार लागला असून अजूनही त्या अर्धवट शुध्दीवर आहेत. ग्रँटरोडच्या भाटिया रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

ताडदेव पोलीस स्टेशनसमोर खड्डे

आदिती ताडदेवमधील फॉरजेट रस्ता येथे राहतात. आदिती बुधवारी ताडदेव पोलीस स्थानकाकडे स्कूटरवरून जात होत्या. पोलीस स्थानकाजवळील मोठ्या खड्ड्यांमध्ये तोल जाऊन त्या खाली पडल्या. अपघातानंतर ताडदेव पोलिसांनी त्यांना तात्काळ नायर रुग्णालयामध्ये दाखल केले. पण, पुढील उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लगेचच भाटिया रुग्णालयामध्ये हलवले.

प्रशासनाने यातून काही तरी शिकले पाहिजे

आदितीचे पती निलेश काडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तिची प्रकृती थोडी स्थिर आहे. पण, अजूनही तिला शुद्ध आलेली नाही. ती उपचारांना प्रतिसाद देतेय. शिवाय, आम्हाला कोणाही विरोधात तक्रार दाखल करायची नाही. आता कोणालाही दोष देऊन फायदा नाही. पण, फक्त प्रशासनाने या सर्वातून काही शिकलं पाहिजे, जेणेकरुन दुसऱ्यांना जीव गमवावा लागणार नाही. तसंच, जेव्हा आदितीचा अपघात झाला तेव्हा मी आणि माझा मुलगा आम्ही ही तिच्या मागे दुसऱ्या बाईकवर होतो. त्या खड्ड्यात आमच्या पैकी आणखी कोणीतरी नक्कीच पडू शकले असते. तिच्या अपघातानंतर सकाळपर्यंत तो खड्डा बुजवण्यात आला होता.

- Advertisement -

आदितीच्या डोक्याला गंभीर दुखापत

भाटिया रुग्णालयाचे सीईओ डॉ. राजीव बोधणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती यांच्या डोक्याच्या डाव्या भागामध्ये गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला जबर मार लागला आहे. शिवाय, थोड्या प्रमाणात अपघातात डोक्याच्या उजव्या बाजूला, डोळ्याजवळ आणि उजव्या हाताच्या कोपरालाही मार लागला आहे. सध्या त्या अर्धवट शुद्धीमध्ये असून काही प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. तसंच, शस्त्रक्रियेविषयी सिटीस्कॅनच्या रिपोर्टनंतर निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -