घरमुंबईआरटीई प्रवेशासाठी राज्यातून २ लाख ९५ हजार अर्ज

आरटीई प्रवेशासाठी राज्यातून २ लाख ९५ हजार अर्ज

Subscribe

मुंबईने प्रथमच गाठला 14 हजारांचा टप्पा

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला यंदा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी यंदा राज्यातून 1 लाख 15 हजार 298 जागांसाठी तब्बल 2 लाख 95 हजार 236 अर्ज आले. पुण्यातून सर्वाधिक तर सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्गातून 379 आले. मात्र यावेळी मुंबईतून प्रथमच 14 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 2014 पासून सुरू झालेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पालकांकडून अर्ज आले आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्केे जागा राखीव ठेवण्यात येतात. बुधवारी संपलेल्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातील 9331 शाळांमधील 1 लाख 15 हजार 298 जागांसाठी तब्बल 2 लाख 95 हजार 236 अर्ज आले. पुण्यातून सर्वाधिक 63 हजार 483 अर्ज आले असून त्याखालोखाल ठाणे 20667, नाशिक 17913, औरंगाबाद 16819 या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. राज्यामध्ये आरटीई प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळत असताना सिंधुदुर्गमधून सर्वात कमी 379 अर्ज, नंदुरबार (854) व गडचिरोलीतून (1019) फारच कमी प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

राज्याप्रमाणे मुंबईतूनही आरटीई प्रवेशाला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्येही 367 शाळांमधील 7202 जागांसाठी यंदा दुप्पट म्हणजे तब्बल 14 हजार 469 अर्ज आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 985 अर्ज अधिक आले आहेत. गतवर्षी मुंबईतून आरटीई प्रवेशासाठी 7 हजार 491 जागांसाठी 11 हजार 584 अर्ज आले होते. 2014 पासून ऑनलाईन नोंदणीला यंदा प्रथमच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशातील जागांची संख्या कमी झाली असली तरी अर्ज जास्त आल्याने प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळेल. आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत 12 किंवा 13 मार्चला काढण्यात येणार आहे. दरवर्षी तीन टप्प्यात काढण्यात येणारी लॉटरी यंदा एकाच टप्प्यात काढण्यात येणार आहे. तसेच शाळेत उपलब्ध जागांएवढीच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाईल अ‍ॅपकडे पालकांचे दुर्लक्ष
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पालकांना सहजरित्या शक्य व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहे. परंतु या अ‍ॅपकडे पालकांकडून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यंदा राज्यातून अवघे 13 अर्ज ऑनलाईन करण्यात आले, यामध्ये मुंबईतून सर्वाधिक म्हणजे 5 अर्ज ऑनलाईन करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे
निवासी पुरावा – रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन देयक, गॅस बुक, बँक पासबुक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा निवासी पुरावा म्हणून सादर करावा, जन्मतारखेचा पुरावा, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, एकल पालकाचे आवश्यक कागदपत्रे

मुंबईतील सात वर्षांतील अर्जाची आकडेवारी
वर्ष – जागा – अर्ज
2014-15 – 8,234 – 1,930
2015-16 – 11,401- 4,096
2016-17 – 9,664 – 6,409
2017-18 – 7,449 – 9,426
2018-19 – 8,374 – 11,358
2019-20 – 7,491 – 11,584
2020-21 – 7,202 – 14,469

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -