घरमुंबईमुख्य सचिवपदी अजोय मेहता

मुख्य सचिवपदी अजोय मेहता

Subscribe

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रविण परदेशी यांची बदली झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता हे राज्याचे मुख्य सचिव होणार असे वृत्त दै. आपलं महानगरने अगोदरच दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. या दोन बदल्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा शुक्रवारी मंत्रालयात होती. दरम्यान, अजोय मेहता हे सोमवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची लवकरच राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रथम वृत्त दै. आपलं महानगरने आपल्या ३ मे अंकात प्रसिद्ध केले होते. आपलं महानगरच्या या वृत्ताने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. आपलं महानगरने प्रसिद्ध केलेले हे वृत्त अखेर शुक्रवारी खरं ठरले. महानगरने दिलेल्या या वृत्तात अजोय मेहता यांच्या नियुक्तीबरोबरच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाबाबत ही भाकित वर्तविण्यात आलं होते. हे भाकीत देखील अखेर खरं ठरले आहे. शुक्रवारी सकाळपासून या दोन्ही बदलांच्या वृत्त आगीसारखे पसरले आणि दिवसभर या बदलीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर शुक्रवारी संध्याकाळी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जाहीर करीत या वृत्तावर शिक्कामोर्तब केला.

- Advertisement -

गेल्या चाळीस दिवसांपासून राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार पाहणारे युपीएस मदान यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिव मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची वर्णी लागली आहे .प्रवीण परदेशी हे गेल्या साडेचार वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील म्हणून परिचित आहे. दोन्ही अधिकारी आपआपल्या पदाची सूत्रे सोमवारी घेणार असल्याचे समजते. तर मावळते मुख्य सचिव मदान यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दाखल केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तात्काळ मंजूर केला आहे. त्यामुळे करार पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी मदान यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भांत सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश निर्गमित केले आहे. त्याच बरोबर पुढील आठवड्यात सिकॉमच्या अध्यक्षपदी युपीएस मदान यांची नियुक्ती करण्यासही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून या संदर्भात उद्योग विभाग स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मेहता
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लोकप्रिय निर्णय घेण्याकरता आणि ते राबविण्याकरिता आपल्या विश्वासातला आणि मोठा अनुभव गाठीशी असलेली व्यक्ती मुख्य सचिव या प्रशासनाच्या सर्वोच्चपदी असावी, यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी निवड करण्याचे निश्चित केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तर त्याच बॅचचे मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना त्यांचा सेवेचा सुमारे पावणे चार वर्षांचा कालावधी होवूनही त्यांना आयुक्तपदीच ठेवण्यात आले. सप्टेंबर २०१९ रोजी मेहता तर ऑक्टोबर २०१९ मध्ये मदान निवृत्त होणार आहेत. मात्र दोघांनाही मुख्य सचिवपद उपकृत करता यावे यासाठीच ही व्यवस्था करण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

कोण आहेत प्रवीण परदेशी?
प्रवीण परदेशी हे १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाआधी वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. १९९३मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी जो कामाचा धडाका दाखवला होता त्याची मोठी प्रशंसा झाली होती. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते.

मदान यांची नियुक्ती वर्षभरासाठी
मदान हे १९८३च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) अधिकारी आहेत. मदान यांची गेल्या मार्चमध्ये राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य सचिवपदाच्या आधी मदान यांनी राज्यातील वित्त विभागाच्या सचिवपदाचा पदभार सांभाळला होता. येत्या ऑक्टोबरमध्ये ते निवृत्त होणार आहेत.ही नियुक्ती एक वर्षासाठी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -