घरताज्या घडामोडीAmbani bomb scare: सचिन वाझेची २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Ambani bomb scare: सचिन वाझेची २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या एनआयए (NIA) कोठडीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे वाझेला आज एनआयएच्या विशेष कोर्टात दाखल करण्यात आले होते. आता सचिन वाझेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझेला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी सचिन वाझेचे वैद्यकीय अहवाल कोर्टात सादर करण्यात आले होते. वाझेची प्रकृती व्यवस्थित असून कुठल्याही उपचारांची गरज नाही, असे एनआयएने कोर्टात सांगितले.

दरम्यान सचिन वाझेच्या भावाकडून वाझेची तब्येत ठीक नसल्याचे वारंवार सांगितले जात होते. वाझेला जेव्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा वाझेच्या वकिलांनी ज्या कोठडीत वाझेला ठेवणार ती त्याच्यासाठी सुरक्षित असावी अशी मागणी केली. या मागणीला न्यायालयाने होकार दिला आहे. शिवाय एनआयएच्या ताब्यात असलेली कागदपत्रे सीबीआय (CBI)ला देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. सचिन वाझेची डायरी आणि इतर काही जमा केलेले पुरावे आहेत ते सीबीआयला जर तपासाठी हवे असतील तर ते देण्यात येतील, असे कोर्टाने सांगितले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि शिवसेना नेते प्रदीप शर्मा यांचे अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील कटात सामील असल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार सचिन वाझेने एनआयएला प्रदीप शर्मा यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सचिन वाझे प्रदीप शर्माच्या यांच्यासोबत काम करत होते. वाझे शर्माला आपला गुरू समजायचे. २५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया इमारतीजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कोर्पिओ गाडी पार्क करण्यापासून ते ५ मार्चला ठाण्यात मनसुख हिरेन हत्या होईपर्यंत प्रदीप शर्मा सचिन वाझेच्या संपर्कात होते. वाझेने याबाबत एनआयएला दुजोरा दिला आहे. एनआयएकडे याबाबतचे अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत.

बुधवारी प्रदीप शर्मा यांची एनआयएने जवळपास साडे सात तास चौकशी केली. त्यानंतर गुरुवारी त्यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. शर्मा दुपारी एक वाजता एनआयए कार्यालयात पोहोचले होते आणि रात्री सव्वा दहा वाजता ते कार्यालयातून बाहेर आले. माहितीनुसार, अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्कोर्पिओमध्ये ठेवलेल्या जिलेटीनच्या कांड्या प्रदीप शर्मा यांनी जवळच्या व्यक्तीकडून वाझेला उपलब्ध करून दिल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – सचिन वाझेचा म्होरक्या कोण?; जयंत पाटलांचा सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -