घरCORONA UPDATE…आणि अंगात पीपीई किट चढवत वडिलांचा मृतदेह नेला अंत्यसंस्काराला!

…आणि अंगात पीपीई किट चढवत वडिलांचा मृतदेह नेला अंत्यसंस्काराला!

Subscribe

घाटकोपरमध्ये शववाहिनीसोबत कामगार नसल्याने मृत व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या मित्राने अंगात स्वसंरक्षक पोशाख अर्थात पीपीई किट चढवत वडिलांचा मृतदेह शववाहिनीत ठेवून अंतिम संस्कारासाठी नेला.

कोरोना कोविड -१९ची बाधा झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या मृतदेहाला स्वकीयही हात लावायला पुढे येत नाही. कोरोना पॉझिटिव्ह असलेली पोटची मुलेही आपल्या वडिलांचा मृतदेह उचलून शववाहिनीत ठेवण्यास नकार दिलेल्या घटना मुंबईसह इतर ठिकाणी घडलेल्या असतानाच घाटकोपरमध्ये शववाहिनीसोबत कामगार नसल्याने मृत व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या मित्राने अंगात स्वसंरक्षक पोशाख अर्थात पीपीई किट चढवत वडिलांचा मृतदेह शववाहिनीत ठेवून अंतिम संस्कारासाठी नेला.

कोरोना कोविड- १९ ची बाधा झालेल्या रुग्णांना कधी रुग्णवाहिका मिळत नाही तर रुग्णालयात खाटा मिळत नाही. परंतु आता तर मेल्यानंतर मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यासाठी शववाहिनीही उपलब्ध होत नाही. आणि मोठ्या प्रयत्नानंतर शववाहिनी मिळाली तरी मृतदेह वाहून नेण्यासाठी कामगार उपलब्ध नसतात. घाटकोपर येथील हिंदु महासभा रुग्णालयात मृत पावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचे शव उचलण्यासाठी शववाहिनीमध्ये पीपीईधारक कामगार नसल्याने, अखेर मुलांना आपल्या अंगात पीपीई किट चढवत वडिलांचे शव अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागले.

- Advertisement -

घाटकोपर पश्चिम येथील साईनाथ नगर रोडवरील गणेश नगर परिसरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खासदार मनोज कोटक, स्थानिक नगरसेविका डॉ.अर्चना भालेराव आणि एन विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या सहकार्याने येथील हिंदुमहासभा कोविड केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री दाखल केले. त्याठिकाणी आयसीयूमध्ये त्यांना दाखल केले. परंतु रविवारी रात्री प्रकृती खालावल्यामुळे केअर सेंटरमधून नातेवाईकांना कल्पना देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी केअर सेंटरमध्ये धाव घेतली. त्यातील एक स्वत:च डॉक्टर आहेत. परंतु तिथे पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी देण्यात आली. त्यामुळे वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलांनी रात्री अडीच वाजता महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधून शववाहिनीची उपलब्धता जाणून घेतली.

शववाहिनी यायला उशिर असल्याने मुलांनी एन विभाग कार्यालय तसेच स्मशानभूमीतील सर्व कागदोपत्री सोपस्कार मध्यरात्री फिरत पार पाडले. त्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत शववाहिनी उपलब्ध न झाल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांना संपर्क केला आणि त्यांनी विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना देवून शववाहिनी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानंतर दोन तासांनी सकाळी साडे आठ वाजता शववाहिनी उपलब्ध झाली. परंतु या शववाहिनीत चालकाशिवाय कुणीच नव्हते. ईद नसल्याने कामगार नसल्याचे कारण चालकाने दिले.

- Advertisement -

मृतदेह उचलून शववाहिनीत ठेवणे आणि पुढे विद्युत दाहिनीपर्यंत नेण्यासाठी पीपीई धारक कामगार असणे आवश्यक होते. परंतु पीपीई धारक कामगार नसल्याने मग पुढील एक तास कामगारांचा शोध सुरु झाला. परंतु कामगार उपलब्ध न झाल्याने मृत व्यक्तीचे दोन्ही मुले आणि त्यांचा एक मित्र तसेच चालक आदींना पीपीई किट अंगात चढवले आणि वडिलांचा मृतदेह केंद्रातून शववाहिनीत ठेवले. आणि तिथून मग अंत्यसंस्कारासाठी घेवून गेले. त्यानंतर सव्वा दहा वाजता त्यांच्यावर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार केले.

महापालिकेची १११६ची हेल्पलाईन निराशाच

दोनच दिवसांपूर्वी आपलं महानगरने महापालिकेच्या १९१६च्या हेल्पलाईनच्या निष्क्रीयेबाबत वृत्त प्रकाशित केले होते. परंतु त्याचा अनुभव पुन्हा एकदा दुसऱ्याच दिवशी समोर आला. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या डॉक्टर मुलाने १९१६वर रात्री अडीच वाजता तक्रार नोंदवून शववाहिनीची मागणी केली. त्यानंतर त्यांना दोन तासांमध्ये शववाहिनी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा तिथे संपर्क केल्यानंतर २० ते २५ मिनिटांमध्ये शववाहिनी येईल, असे सांगण्यात आले. पण सकाळचे सात वाजले तरी शववाहिनी आली नाही. उलट विभाग कार्यालयाने साडेआठ वाजता केवळ चालक असलेली शववाहिनी पाठवून दिली. पण १९१६च्या हेल्पलाईनवरील नोंदणीनुसार शववाहिनी पाठवण्यात आली नव्हती. त्यामुळे हेल्पलाईनवर संपर्क साधूनही आधी बाधित रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही आणि आता मेल्यानंतर शववाहिनीही मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -