घरमुंबईभ्रष्टाचाराने त्यांची पोटेही छप्पन इंचाची झाली

भ्रष्टाचाराने त्यांची पोटेही छप्पन इंचाची झाली

Subscribe

अशोक चव्हाणांचा टोला

छप्पन इंचाची छाती असलेल्यांची पोटेही आता भ्रष्टाचाराचा पैसा खाऊन छप्पन इंचाची झाली आहेत, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी सत्तेवर येताना भाजपने सर्वसामान्य जनतेला वारेमाप आश्वासने दिली. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचा वादा मोदींनी केला होता. या हिशेबाने गेल्या पाच वर्षांत दहा कोटी रोजगार उपलब्ध होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र नोटबंदीसारख्या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार गेल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. या सरकारने लोकांच्या भावनांचे राजकारण केले. शिवछत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून हे सरकार सत्तेवर आले आणि प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत आंबेडकर स्मारक असो की शिवस्मारक या दोन्ही स्मारकांपैकी एका स्मारकाची साधी एक वीटही हे सरकार रचू शकले नाही.

- Advertisement -

एवढेच नव्हे तर या देशाची लोकशाही ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर टीकून आहे, त्या संविधानाची प्रत जाळणारे आजही या सरकारच्या काळात उजळ माथ्याने फिरत आहेत. गांधी पुण्यतिथीला गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणारे माथेफिरूंवर या सरकारने साधी कारवाईही केलेली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे या निवडणुकीत संविधानाचा मान राखणार्‍या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद द्या, असे सांगतानाच काँग्रेस महाआघाडीचे सरकार जर सत्तेवर आले तरच या देशातील लोकशाही टीकेल, अधिक बळकट होईल, असेही चव्हाण म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात तुम्हाला जो डास चावतो, तोच डास मला चावतो, त्यामुळे तुमचे आणि माझे रक्ताचे नाते आहे, असे बेजबाबदार विधान करून ठाकरेंनी धारावीतीलच नव्हे तर समस्त गरीब वर्गाची चेष्टा केली आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -