घरमुंबईमुंबईतला 'बी' वॉर्ड कोरोनाबाधितांच्या यादीत शेवटच्या स्थानावर! काय आहे कारण?

मुंबईतला ‘बी’ वॉर्ड कोरोनाबाधितांच्या यादीत शेवटच्या स्थानावर! काय आहे कारण?

Subscribe

मुंबईत सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच अत्यंत दाटीवाटीच्या मस्जिद बंदर, डोंगरी, दाणा बंदर, उमरखाडी आदी महापालिकेचा ‘बी’ विभाग कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. मुस्लिम बहुल तसेच दाटीवाटीने असलेल्या या ‘बी’ विभागात सुरुवातीला विलगीकरण (क्वारंटाईन) केलेल्या संशयित रुग्णांची संख्या अधिक होती. पण यावर योग्य प्रकारे नियोजन राखत तसेच मनुष्यबळ वाढवत येथील रुग्ण संख्या नियंत्रणात राखण्यात महापलिकेचे सहायक आयुक्त नितीन आर्ते आणि त्यांच्या टीमने यश मिळवले आहे. सुरुवातीला काही प्रमाणात सहकार्य न करणाऱ्या मुस्लिम समाजाने रमजान सणासह पुढे प्रत्येक वेळी सहकार्य दिल्यामुळे अत्यंत दाटीवाटीच्या या विभागातही कोरोनाचा आजार नियंत्रणात राखता आला आहे.

दाटीवाटीचा परिसर असल्याने होती चिंता

डोंगरी, इमामवाडा, उमरखाडी या महापालिकेच्या बी विभागात आतापर्यंत एकूण ११३६ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ८२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर २२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेचा हा ‘बी’ विभाग बहुतांशी मुस्लिम बहुल असून ६० ते ७० टक्के मुस्लिम समाजाची लोकवस्ती आहे. सुरुवातीच्या काळात या विभागात क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या वाढेल अशी भीती व्यक्त केली जात होती. सुमारे दोन लाख लोकवस्तीचा हा मुंबईचा सर्वात छोटा विभाग असला तरी दाटीवाटीची वस्ती असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती जास्त होती. पण आताची आकडेवारी पाहता हाच विभाग आता पूर्ण सुरक्षित आहे.

- Advertisement -

रमजान काळात दाखवला समजुतदारपणा

सुरुवातीला या विभागात मुस्लिम समाजातील लोक कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हते. परंतु जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला, त्यानंतर लोकांचे सहकार्य मिळू लागले. विशेष म्हणजे रमजानच्या काळात मुस्लिम समाजातील लोकांनी दाखवलेला समजदारपणा आणि खासदार, आमदार आणि नगरसेवकांसह इतर राजकीय पक्षांनी आपली जबाबदारी ओळखून केलेले सहकार्य या बळावरच आज हा विभाग कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत अगदी शेवटच्या क्रमांकावर असल्याचे आर्ते सांगतात. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७७ दिवसांवर तर रुग्ण वाढीचे सरासरी प्रमाण हे सरासरी ०.८० टक्क्यांच्या तुलनेत ०.९२ टक्के एवढे आहे.

सुरुवातीला वाढत्या रुग्णांमुळे कर्मचारी थकायला लागले होते. त्यावेळी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला. त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे आमचा वार्ड आज शेवटून पहिल्या क्रमांकावर असल्याचे नितीन आर्ते सांगतात. येत्या १ सप्टेंबर रोजी सेवा निवृत्त होणाऱ्या आर्ते यांनी आजवरच्या महापालिकेतील कामातील सर्व अनुभव पणाला लावून प्रसंगी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत या विभागातील रुग्ण संख्या अधिक वाढणार नाही याची काळजी घेतली. कोरोनाला हद्दपार करूनच आपण सेवानिवृत्त होणार असे सांगणाऱ्या आर्ते यांना कोरोना पूर्णपणे नाही पण बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश मिळत असताना निवृत्त व्हावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन या अधिकाऱ्याला मुदतवाढ देत त्यांना त्यांच्या कामाचे बक्षीस देते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -