घरमुंबईबाळा नांदगावकर लवकरच विधान परिषदेत

बाळा नांदगावकर लवकरच विधान परिषदेत

Subscribe

मनसेच्या मदतीने भाजपचे महापालिका निवडणुका लक्ष्य

अख्ख्या देशभरात होळीच्या रंगांची उधळण सुरू असताना भाजपने मध्य प्रदेशात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार उलथवून लावले. आता भाजपने आपला मोर्चा महाराष्ट्रात वळवण्यासाठी कंबर कसली असून त्यासाठी राज ठाकरे यांना साथीला घेऊन ‘जोर का धक्का धीरे से’ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विधान परिषदेत पाठवून मनसेची साथ मिळवण्याची रणनिती आखली आहे.

शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादीची साथसोबत करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यामुळे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे राज्य भाजपच्या हातून निसटल्याचा सल केंद्रीय नेतृत्वाला सलतो आहे. या प्रक्रियेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही निर्णयांचा फटका भाजपला बसला आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेसारख्या पक्षाला आव्हान देण्यासाठी भाजप नेतृत्वाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची निवड करून त्यांना गळाला लावण्याची रणनिती आखली आहे.

- Advertisement -

यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच्या बैठकांबरोबरच गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबरही दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अमित शहा यांच्याशी चंद्रकांत पाटील यांचे असलेले स्नेहसंबंध सर्वश्रुत आहेत. त्यानंतर राज्यात आशिष शेलार यांच्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांचे काकणभर जास्तच प्रेम आहे. त्याच आशिष शेलार यांच्याशी राज ठाकरेंची असलेली मैत्री लक्षात घेऊन त्यांनाच दिल्लीश्वरांनी ‘राजदूत’ म्हणून जबाबदारी दिली आहे. त्याचाच भाग म्हणून शेलार यांनी गेल्या महिन्याभरात चार वेळा ‘कृष्णकुंज’वर जाऊन खलबते केली आहेत. त्याचाच भाग म्हणून यंदा मनसेने आपला ९ मार्चचा पक्षाचा वर्धापनदिन नवी मुंबईत साजरा केला. याच कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करून राज यांनी सरकारला कोंडीत पकडायची खेळी खेळली आहे. पुढील महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची होणारी निवडणूक, गणेश नाईक यांच्याशी असलेले राज यांचे मधुर संबंध, सेनेसाठी नवी मुंबईत असलेली भुसभुशीत जमीन, तिथले पक्षीय वाद या पार्श्वभूमीवर राज यांच्याशी युती करून सेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भाजपच्या वांद्रेकरांनी डाव रचला आहे. त्याला दिल्लीतून विशेष आशीर्वाद मिळाल्याची माहिती राज्यातून राजधानीत गेलेल्या एका वजनदार बड्या नेत्याने दिली.

तर दुसरीकडे राज यांच्या धरसोड वृत्तीमुळे अनेक नेत्या-कार्यकर्त्यांनी गेल्या १४ वर्षांत त्यांची साथ सोडली. राज ठाकरेंच्या मोठ्या राजकीय अपयशामुळे बाळा नांदगावकर यांच्यासारखा नेता घुसमट अनुभवत असल्याने पक्षाला मरगळ आली आहे. मात्र या नैराश्यदायी वातावरणातही नांदगांवकर यांनी राज यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच पक्षात आणि पक्षाबाहेरही त्यांना स्वत:चा जनाधार आहे.

- Advertisement -

यंदा ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत २२ सदस्यांना जाण्याची संधी मिळणार आहे. त्यातील आठ जण आमदारांमधून तर दहा जण राज्यपाल नियुक्त आणि चार शिक्षक आणि पदवीधर संघातून निवडून जाणार आहेत. ही प्रक्रिया एप्रिल ते जून अशी अडीच महिने चालणार आहे. त्यात बाळा नांदगावकर यांच्यासारख्या मागासवर्गीय नेत्याला विधान परिषदेत घेऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा चंगही भाजप नेतृत्वाने बांधला आहे. आमदारांमधून जाण्याऐवजी नांदगांवकर यांना राज्यपाल नियुक्त करून सुरक्षितरित्या आमदार करण्याबाबत भाजपत खल सुरू आहे. नांदगावकर यांच्या निवडीने मनसे पक्ष उत्तेजित झाला तर नवी मुंबई, औरंगाबाद आणि त्यानंतरच्या मुंबई महानगरपालिकेचा पेपर सेनेला कठीण जाऊ शकतो, याचे आडाखे भाजपच्या थिंक-टँकने बांधले आहेत.

याबाबत बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, मला याबाबत कुणीही विचारणा केलेली नाही. युतीचा निर्णय हा पक्षाध्यक्षांचा आहे. मी त्यांच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही त्यांनाच विचारा, असं ते म्हणाले. भाजप नेते आशिष शेलार यांना नव्या राजकीय समीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की अजून काही ठरलेले नाही. पण असे काही मूर्त स्वरुपात येणार असेल तर त्याची रणनिती आखावी लागेल. ती एका व्यक्तीची नसून सामूहिक असेल. भाजप हा सामूहिक प्रयत्नांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. थोडी प्रतीक्षा करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -